पुण्यातील तरूणाईला मॅजिक मश्रूमची झिंग

पुणे – पुण्याच्या महाविद्यालयीन तरूणांत तसेच पब, नाईट क्लब, डिस्कोत हजेरी लावणार्‍या तरूणांना सध्या मॅजिक मश्रूमच्या झिंगने घेरले आहे. परिणामी पुणे अमली पदार्थ विरोधी पथकाची झोप उडाली असून हा नवा मॅजिक पदार्थ शहरात कुठून , कसा व कधी येतो यावर कडक पाळत ठेवली जात आहे तसेच पाच महाविद्यालयांवरही या पथकाने करडी नजर ठेवली आहे.

कोकेन , हेरॉईन, भांग, अफू, चरस या अमली पदार्थोसोबतच आजकाल खोकल्याची औषधे, व्हाईटनर यांची नशा करण्याचे प्रमाणही तरूणांत वाढते आहे. मात्र मॅजिक मश्रूम हे नांव अमली पदार्थ विरोधी पथकाच्या यादीत नव्यानेच आले आहे. ही मश्रूम विकणार्‍या राकेश किडो या तरूणाला या पथकाने नुकतेच ताब्यात घेतले असून त्याच्याकडून मिळालेली माहिती धक्कादायक आहे.

तमीळनाडूच्या कोडईकॅनाल भागात या मश्रूमची बेकायदेशीर शेती केली जात असून ही मश्रूम अन्य अमली पदार्थांच्या तुलनेत स्वस्त आणि कोणताही संशय न येता वापरता येणारी आहेत. नशेसाठी ही मश्रूम कच्ची खाल्ली जातात आणि त्याच्या एका गोळ्यासाठी ४०० रूपये मोजावे लागतात. कोडा याने या मश्रूमची विक्री अनेक ठिकाणी केली असून त्यात परदेशी तरूणांचाही विक्रीत सहभाग आहे असे समजते.