डॉ दाभोळकर खून प्रकरण – गोव्यात पकडलेल्याला सोडून दिलेˆ आता फूटेज लंडनला पाठविणार

पुणे, काल गोव्यातून आणलेल्या संशयितास आज सोडून देण्यात आले असून आतापर्यंत कोठेही पुरावा व संशयित न सापडल्याने आजपर्यंत उपलब्ध झालेले सीसीटीव्ही फूटेज लंडनच्या लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहे. मुंबई येथे ते फूटेज पाठविण्यात आले असून कागदोपत्री पूर्ततांचे काम सुरू आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त शहाजी सोळुंके यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

डॉ. दाभोलकर यांची हत्या करणारे मारेकरी गाडीवरून जातानाचे एक फूटेज पुलाजवळील एका इमारतीतील कॅमर्‍यात मिळाले आहे. ते अत्यंत ओझरते असून त्यातून काहीही बोध होत नाही. त्यामुळे अत्याधुनिक यंत्रणेद्वारे ते तपासण्यासाठी लंडण येथे पाठविण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. दाभोलकर हे हत्या झालेल्या वेळी पुलावर एकटेच असण्याची शक्यता नाही. सकाळच्या वेळी फिरायला जाणारे अनेक नागरिक तेथून जात असणार आहे. त्यांपैकी कोणी ही घटना प्रत्यक्ष पाहिली असेल त्यांनी पुढे येऊन पोलिसांना माहिती दिल्यास अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ही गरज लक्षात घेऊन नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. सीसीटिव्ही फूटेजमध्ये एक महिलाही चालत जाताना दिसते. ती महिला कोण आहे ते तपासून पाहणे सुरू आहे. त्यांनी ही घटना पाहिली असल्यास त्यांनी पोलिसांना माहिती द्यावी, त्यांचे अगर अन्य कोणीही या घटनेची माहिती दिली तरी त्यांची नावे गुप्त ठेवण्यात येतील, असे आवाहन सोळुंके यांनी पुन्हा केले आहे. सोडून देण्यात आलेल्या सनातनच्या साधकाचे त्या दिवशीचे लोकेशन तपासण्यात येत असून गरज पडेल तेव्हा पोलिसांकडे हजर राहण्याच्या अटीवर त्याला सोडून देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.