भटकळला महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न सुरू

पुणे, – बिहारनेपाळ सीमेवर अटक केलेला इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सदस्य यासीन भटकळ हा पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, जंगली महाराज रस्त्यावरील साखळी बॉम्बस्फोट तसेच मुंबई येथे जुलै 2011 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांसाठी महाराष्ट्र पोलिसांना हवा आहे. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यासाठी दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएसचे) एक पथक बिहार येथे रवाना झाले आहे. त्याला महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे; मात्र वेळ लागू शकतो, अशी माहिती एटीएसच्या अधिकार्‍यांनी पुण्यात दिली.

. शनिवार दिनांक 13 फेब्रुवारी 2010 रोजी संध्याकाळी जर्मन बेकरीमध्ये बॉम्बस्फोट होऊन 17 जणांचा मृत्यू झाला तर अन्य 60 हून अधिकजण जखमी झाले होते. तो बॉम्ब स्वत: यासीन यानेच जर्मन बेकरीत ठेवल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले असून जंगली महाराज रस्त्यावरील साखळी बॉम्बस्फोटातही त्याचाच हात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी राज्य एटीएसने केवळ हिमायत इनायत मिझा बेग या एकाच दहशतवाद्याला अटक केली असून त्याला न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. त्यावर त्याच्या वकिलांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

‘जर्मन बेकरी’ प्रकरणातील मुख्य आरोपी यासीन भटकळ आणि मोहसीन चौधरी, रियाज इस्माईल शाबाद्री ऊर्फ भटकळ, इ्नबाल इस्माईल शाबाद्री उर्फ इकबाल भटकळ, फैय्याज कागजी ऊर्फ झुल्फिकार फैय्याज अहमद, सय्यद जबीउद्दीन सय्यद जकिउद्दीन ऊर्फ जबी अन्सारी ऊर्फ अबू जुंदाल यांच्यावर आरोप आहेत. यांपैकी यासीन भटकळ, रियाज भटकळ आणि इकबाल भटकळ हे तिघे सख्खे बंधू आहेत. यासीन यानेच इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेची स्थापना केल्याचे पोलीस तपसातून निष्पन्न झाले आहे. भटकळ हा नेपाळमार्गे पाकिस्तानात जाण्याच्या तयारीत असताना आयबीच्या अधिकार्‍यांनी आज सकाळी पकडले. भटकळ याच्या अटकेमुळे पोलीस अधिकार्‍यांत समाधानाचे वातावरण पसरले असून या अटकेमुळे देशभरातील अनेक बाँम्बस्फोटांच्या तपासाला गती मिळेल, अशा प्रतिक्रिया त्यांनी व्य्नत केल्या आहे.