मुंबई- देशात कृष्णजन्माष्टमीची धूम असून गोविंदा हंडी फोडण्यासाठी आतुर झाले आहेत. मात्र चलन बाजारात अवमूलनाने रुपयाची हंडी बुधवारी आणखी घसरली आणि त्याने सत्तरीकडे आणखी एक पाऊल टाकले. बुधवारी डॉलरच्या तुलनेत त्यामध्ये 256 पैशांनी अवमूलन झाले आणि तो 68.80 वर बंद झाला. रुपयाचे हे एका दिवसातील ऐतिहासिक अवमूलन ठरले.
रुपया घसरला; सोने 34,500 वर
अवमूलनाचे एक-एक मैलाचे दगड’ पार करणारा रुपया झपाटयाने सत्तरीकडे कूच करत आहे. रुपयाला केवळ डॉलरच भारी पडत आहे असे नाही, तर जगभरातील जवळपास सर्वच चलनांसमोर रुपयाचा थरकाप उडला आहे. ब्रिटिश पौंड, युरो आणि स्विस फ्रँक यांसारख्या प्रमुख चलनांच्या तुलनेतही अवमूलनाची सीमा पार केली आहे. मे महिन्यापासून डॉलरच्या तुलनेत रुपयाचे 28 टक्क्यांनी मूल्य घसरले आहे. मात्र याच वेळी पौंडसमोर 106, युरो 92, स्विस फ्रँक 75, कॅनडियन डॉलर 65, ऑस्ट्रेलियन डॉलर 60 अशी नीचांकी पातळी गाठली. दरम्यान, चलनातील अवमूलन हे आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे होत असून त्याची काळजी करण्याचे कारण नाही, असे अर्थ खात्याने म्हटले आहे.
रुपयाचे अवमूलन, जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत यामुळे साठेबाज आणि गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीने बुधवारी सराफा बाजारात सोन्याच्या भावाने विक्रमी झेप घेतली. दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 34,500 च्या उच्चांकी स्तरावर गेला. तर मुंबईतही सोन्याच्या भावात प्रति तोळा 680 रुपयांची वाढ झाली आणि त्याने 33,265 चा उच्चांकी स्तर गाठला. याआधी सोन्याने 27 नोव्हेंबरला 32,975 चा उच्चांकी स्तर गाठला होता. त्याचबरोबर चांदीमध्येही किलोमागे 2,800 रुपयांची वाढ झाली आणि भाव 59,470 वर बंद झाला. सात महिन्यांनंतर चांदीने पुन्हा एकदा 59,000 ची पातळी ओलांडली.
एकाबाजूला रुपया रोज नवा नीचांक नोंदवत असताना, दुस-या बाजूला सोन्याच्या किंमतीतही विक्रमी वाढ होत आहे. बुधवारी रुपयाने 68.80 नीचांकी पातळी गाठली, तर प्रतितोळा सोन्याचा दर 34,500 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. भारतात सोन्यातील गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. रुपयाच्या अवमूलनामुळे धस्तावलेले गुंतवणूकदार सराफ बाजारात मोठया प्रमाणावर सोन्या-चांदीची खरेदी करत आहेत. त्यामुळे सोन्याच्या दराने विक्रमी पातळी गाठली आहे. बुधवारी प्रतितोळा सोन्याच्या दरात 1900 रुपये वाढ झाली. चांदीच्या दरातही 3700 रुपये वाढ झाली असून, एक किलो चांदीचा भाव 58,500 रुपये झाला आहे. सोन्याच्या दराने यापूर्वीचे सर्व विक्रम मोडले आहेत. गेल्यावर्षी 27 नोव्हेंबर रोजी सोने 32,975 रुपये या सर्वाधिक किंमतीला बंद झाले होते. त्यानंतर बुधवारी सोन्याच्या दराने हा नवा विक्रम केला.
महिना अखेर असल्याने आयातदारांकडून वाढलेली डॉलरची मागणी, गुंतवणूकदारांमध्ये असलेले अविश्वाचे वातावरण आणि अन्न सुरक्षा विधेयकामुळे तूट वाढण्याची भिती या सर्वाचा एकत्रित परिणाम रुपयावर होत आहे. रुपयाच्या अवमूलनामागे सोन्याची वाढती आयात हे देखील एक प्रमुख कारण आहे. ही आयात रोखण्यासाठी सरकारने आयात शुल्कात वाढ केली होती. तरीही सोन्याची मागणी वाढली आहे. परिणामी सोन्याचा दर विक्रमी उच्चांक गाठत आहे.
