नवी दिल्ली – भारतीय आर्थिक धोरणे चुकीच्या पध्दतीने राबवली जात आहेत त्यामुळे जगात भारताच्या अर्थव्यवस्थेविषयीचा विश्वास उरलेला नाही, अशी टीका नामवंत उद्योगपती रतन टाटा यांनी केली आहे. भारताची घसरत चाललेली ही विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेले सरकारचे प्रयत्न फार धिम्या गतीने सुरू आहेत. किंबहुना आपण विश्वासार्हता गमवत आहोत याची फारशी गंभीर जाणीव या सरकारला झालेली नाही असे टाटा यांनी म्हटले आहे.
आर्थिक धोरणांवर रतन टाटांची टीका
पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याविषयी उद्योगपतींच्या मनात आणि जनतेच्याही मनात आदर आहे परंतु अलीकडच्या काळात त्यांनी हा आदर गमावला आहे. असेही रतन टाटा यांनी म्हटले आहे. रतन टाटा यांनी नरेंद्र मोदी यांच्याविषयी आश्वासक सूर काढला. ते जगाचा विश्वास कमावून देऊ शकतील असे ते म्हणाले परंतु तरीही नरेंद्र मोदी हे काम किती प्रभावीपणे करू शकतील हे आताच सांगू शकत नाही असेही प्रतिपादन त्यांनी केले.
आज तरी आपल्या देशाला लाभलेले नेतृत्व भारताला जगात प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या कामात अपयशी ठरलेले आहे, अशी घणाघाती टीका टाटा यांनी केली. आज देशाला समर्थ नेतृत्व उरलेले नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेची विविध दिशांनी ओढाताण सुरू आहे. असे त्यांनी खेदाने नमूद केले.
