
मुंबई – महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांविरोधात सध्या ईडीची कारवाई सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांनी राज्यात विधानसभा निवडणुकांच्याही पूर्वीपासून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील काही नेत्यांचा तपास सुरू केला होता. सध्या ईडी, आयकर विभाग किंवा सीबीआय अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, अनिल परब अशा अनेक नेत्यांची चौकशी करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपकडून राजकारणासाठी वापर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असताना भाजपकडून देखील हा आरोप सातत्याने फेटाळून लावला जात आहे.
ईडीच्या कारवाईवर भाष्य करताना उदयनराजे भोसले यांनी भाजपलाही दिला घरचा आहेर
दरम्यान आता यावर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी भाष्य केले असून ईडीने हिंमत असेल तर आपल्याकडे यावे असे म्हटले आहे. एबीपी माझाशी ते बोलत होते. ईडीच्या कारवाईवर भाष्य करताना उदयनराजे भोसले यांनी भाजपलाही घरचा आहेर दिला आहे. एकमेकांचे झाकायचे आणि सोयीप्रमाणे काढायचे, अशा शब्दांत त्यांनी भाजपसहित इतर पक्षांवरही टीका केली. ईडी आपल्याकडे आली तर सर्वांचीच यादी देतो, असेही ते यावेळी म्हणाले.
जसे आपण पेरतो तसे उगवतो. आमच्या मागे ईडी नाही…ज्यांनी वाईट केले आहे त्यांच्याच मागे का लागले आहेत. हिंमत असेल तर माझ्याकडे ईडीने यावे. मी ईडीला पुराव्यासकट यादी देईन, असे उदयनराजे यावेळी म्हणाले. यावेळी त्यांना ईडीच्या कारवाईमागे भाजपचे षडयंत्र असल्याच्या आरोपाविषयी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, कोणीही असू दे सर्वांची यादी मी देतो. एकमेकांचे झाकायचे आणि सोयीप्रमाणे एकमेकांचे काढतात. आता बस्स झाले हे राजकारण, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.
