समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांना स्पष्ट भूमिका मांडून दिले उत्तर


मुंबई – एनसीबीने २ ऑक्टोबरला क्रूजवर टाकलेला छापा, त्यातून अटक करण्यात आलेला शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान आणि या सर्व प्रकरणावर नवाब मलिक यांनी केलेले आरोप या मुद्द्यांची राज्यात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याआधी देखील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. नवाब मलिक यांनी आज देखील आपला जावई समीर खान याला एनसीबीने अडकवल्याचा आरोप केला. त्यांनी यावेळी न्यायालयाचा अहवाल आणि त्यापाठोपाठ समीर वानखेडे यांचा नंबर देखील जाहीर केला आहे. यानंतर आता समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी यावेळी या प्रकरणावर स्पष्टपणे भूमिका मांडली आहे.

आज सकाळी ११ वाजता नवाब मलिक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमधून समीर वानखेडे आणि एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. कोर्ट ऑर्डरमध्ये म्हटले की २०० किलो गांजा मिळालेला नाही. फक्त शाहिस्ता फर्निचरवालाकडे ७.५ ग्राम गांजा मिळाला. बाकी सगळे हर्बल टोबॅको असल्याचे रिपोर्टमध्ये आले आहे. प्रश्न हा उपस्थित होतो की एवढ्या मोठ्या एनसीबीसारख्या एजन्सीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही, हे आश्चर्यकारक आहे. या एजन्सींकडे इन्स्टंट टेस्टिंगचे किट असते. ज्यातून अंमली पदार्थ आहे किंवा नाही, हे लगेच समजते. याचा अर्थ त्यांनी या सर्व गोष्टी तपासल्या, गांजा नव्हता, तरी पण लोकांना अडकवण्यात आले. २७ अ चे कलम लागूच होत नाही. शाहिस्ता फर्निचरवालावर खटला दाखल होतो. पण तिला त्याच दिवशी जामीन देण्यात आला. रिया चक्रवर्ती प्रकरणात देखील करण सजनानीला गुंतवले. राहिला फर्निचरवाला या आरोपीला देखील गुंतवले. रिया चक्रवर्ती प्रकरणातील एका आरोपीला या प्रकरणात टाकल्याचा दावा नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांनंतर दुपारी यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली आहे. यासंदर्भात माध्यमांनी विचारणा केली असता समीर वानखेडे म्हणाले, सध्या हे प्रकरण वरच्या कोर्टात आहे. अशा प्रकरणामध्ये आपण त्यावर काही बोलू शकत नाही. २०० किलो गांजा सापडलाच नसल्याचा उल्लेख कोर्टाच्या अहवालात असल्याचे नवाब मलिक म्हणाले आहेत. त्यावर बोलताना समीर वानखेडे यांनी फक्त, रिपोर्ट तुम्ही व्यवस्थित वाचा, एवढेच म्हटले आहे. त्यामुळे नेमके अहवालात काय लिहिले आहे, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. नवाब मलिक यांनी वानखेडेंचा नंबर पत्रकार परिषदेत जाहीर केल्याबद्दल ते म्हणाले, माझा नंबर जाहीर केला, हरकत नाही, ती त्यांची इच्छा आहे.