सोन्याचा भाव ३३ हजार ५७७

नवी दिल्ली – सोन्याच्या भावाने काल मंगळवारी १० ग्रॅम मागे १७०१ रुपयांची उसळी घेतली. सोमवारी बाजार बंद होताना १० ग्रॅम सोन्याचा दर ३१ हजार ८७६ रुपये होता. तो मंगळवारी बाजार बंद होताना ३३ हजार ५७७ झाला सोन्याच्या भावात झालेल्या या प्रचंड वाढीचा प्रभाव अभावितपणेच रुपयावर झाला आणि मंगळवारचा बाजार संपताना रुपयाची किंमत एक डॉलरला ६६ रुपये २५ पैसे असा गडगडला.

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये झालेल्या सोन्याच्या भावाच्या वाढीचे परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर झाले आणि भारतातल्या सोन्याच्या व्यापार्‍यांनी जगातील दरांच्या लाईनमध्ये येत सोन्याचा भाव काल ३३ हजार ५७७ असा वाढविला. चांदीचा भावसुध्दा काल किलोमागे ३ हजार १३३ रुपयांनी वाढला आणि दर किलोस ५६ हजार ९२० असा झाला.

सोन्याचा आणि चांदीचा दर वाढत असला तरी सोन्याची खरेदी प्रचंड प्रमाणावर सुरू आहे. ज्या अर्थी सोन्याचे दर वाढत आहेत त्या अर्थी सोन्यातली गुंतवणूक फायद्याची ठरणार आहे अशी लोकांची भावना झाली असून लोक वरचेवर जास्त सोने खरेदी करत आहेत. परिणामी येत्या काही दिवसांत सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ञ मंडळींनी व्यक्त केली आहे.

एका बाजूला असे दर वाढत असताना सरकारने सोन्याच्या आयातीवरचा कर वाढवला आहे. कर वाढवल्याने आयात कमी होईल असा सरकारचा अंदाज होता परंतु कर वाढले तरी सोन्याची आयात वाढत चालली आहे. एप्रिल ते जुलै या तिमाहीत भारतात ३८३ टन सोने आयात केले गेले. ते आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.