रेल्वेच्या मालवाहतुकीचे दर वाढणार

नवी दिल्ली – रेल्वेचे माल वाहतुकीचे दर येत्या ऑक्टोबरमध्ये वाढण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसांपासून इंधन तेलाच्या भावात झालेल्या चढ उतारामुळे रेल्वेच्या वाढत्या खर्चाचा आढावा घेतला जाईल तेव्हा वाहतुकीचे दर वाढविणे अपरिहार्य ठरेल असे रेल्वे राज्यमंत्री अभीररंजन चौधरी यांनी नवी दिल्लीत एका परिसंवादात बोलताना सांगितले. इंधनामुळे वाढलेला खर्च भरून काढण्यासाठी केवळ मालवाहतुकीचेच दर वाढवले जातील. प्रवाशांच्या वाहतुकीचे दर वाढवले जाणार नाहीत असा खुलासा त्यांनी केला.

गेल्या एप्रिल महिन्यात रेल्वेने इंधनात वाढलेल्या खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी ५.७ टक्के दरवाढ केलेली होती. आता एप्रिलपासूनच्या सहा महिन्यात सगळ्यात इंधनाचे दर वाढले आहेत. त्यामुळे दरवाढ अपरिहार्य ठरणार आहे. अशा प्रकारच्या आढाव्यानंतर सातत्याने दरवाढ करावीच लागते आणि त्यासाठी केंद्र सरकारने रेल टेरिफ ऍथॉरिटी (आरटीए) अशी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. या यंत्रणेच्या प्रस्तावाला चालू महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळेल असे चौधरी यांनी सांगितले.

रेल्वेचे आधुनिकीकरण: संधी आणि आव्हाने या विषयावरील परिसंवादात श्री. चौधरी बोलत होते. आधुनिकीकरणाच्या बाबतीत भारताने चीनचे अनुकरण केले पाहिजे असे त्यांनी प्रतिपादन केले. चीन आणि भारत रेल्वेने जोडले गेले पाहिजे असे सांगतानाच श्री. चौधरी यांनी एक ना एक दिवस तरी आपण दिल्ली ते बिजिंग असा रेल्वेने प्रवास करू अशी आशा व्यक्त केली.