
नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशनने देशातील खासगी मेडिकल कॉलेजमधील जागा रिक्त राहू नयेत म्हणून शेवटच्या क्षणी NEET-SS या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यावरुन केंद्र सरकार आणि नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशनला फटकारले आहे. देशातील वैद्यकीय शिक्षण हा एक व्यवसाय बनल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.
NEET-SS या परीक्षेत केलेला बदल हा आश्चर्यकारक; सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
NEET-SS या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये अगदी शेवटच्या क्षणी नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशनने बदल केल्यामुळे या परीक्षेची वर्षभरापासून तयारी करणाऱ्या मुलांवर परिणाम होत असून, त्यांच्यासाठी हा बदल धक्कादायक असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.
या विषयासंबधित एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु होती. केवळ खासगी मेडिकल कॉलेजमधील रिक्त राहणाऱ्या जागा भरायचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन अगदी शेवटच्या क्षणी NEET-SS या परीक्षेत केलेला बदल हा आश्चर्यकारक असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. त्याचबरोबर न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड म्हणाले की, देशातील वैद्यकीय शिक्षण हा एक प्रकारचा व्यवसाय बनला असल्याचे दिसत असून वैद्यकीय शिक्षणाची आणि विद्यार्थ्यांची ही शोकांतिका आहे.
NEET-SS परीक्षेसाठी या आधी असलेल्या पॅटर्नमध्ये 60 टक्के प्रश्न हे त्या-त्या विभागाशी संबंधित होते. त्यामुळे संबंधित विभागात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते सोयीस्कर व्हायचे. NEET-SS परीक्षेच्या पॅटर्नमध्ये आता नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशनने नवीन बदल केला असून सर्व प्रश्न हे जनरल मेडिसिनवर विचारले जाणार आहेत.
