शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत संजय राऊतांचे मोठे भाष्य


नवी दिल्ली : शिवसेनेच्या यंदाच्या दसरा मेळाव्याविषयी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठे भाष्य केलं आहे. त्यांनी सांगितले की, यंदाचा दसरा मेळावा प्रत्यक्ष व्हावा अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. त्यामुळे यंदा दसरा मेळावा ऑनलाईन होणार नसल्याचे ते म्हणाले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने पार पडला होता. राऊत पुढे म्हणाले की, यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा ॲानलाईन पद्धतीने होणार नाही, तर प्रत्यक्ष पद्धतीने मेळावा होणार आहे. दसरा मेळावा कोरोना नियमांचे पालन करून होईल. याबाबत लवकरच शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत पुढे म्हणाले की, सरकारी यंत्रणांचा वापर करून लखीमपूर हिंसाचार प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे. शेतकऱ्यांसाठी आवाज उठवण्यात राजकारण काय, हे विरोधकांचे कर्तव्य असल्याचेही ते म्हणाले. राहुल गांधींना तिथे जाऊ दिले जाणार नाही. लोकशाहीत आवाज उठवणाऱ्यांची नाकेबंदी केली जात आहे. सरकार विरोधी बोलणा-यांना देशद्रोही ठरवले जात असल्याचा असा आरोप देखील संजय राऊतांनी केला.

काल संजय राऊत यांनी म्हटले होते की, देशात नवी गुलामगिरीची सुरूवात झाली आहे. लखीमपूरची घटना म्हणजे आणीबाणी पेक्षा भयानक आहे. मोदींना गांधी घराण्याची भिती वाटत आहे म्हणून प्रियंका गांधींना अडवले जात आहे. योगींनी या प्रकरणी राजीनामा द्यायला पाहिजे. मोदी देशाचा अमृत महोत्सव साजरा करायला लखनौला जातात, पण अमृत महोत्सव रक्ताने माखला असल्याचेही राऊत म्हणाले.