इजिप्तमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरूच

कैरो – इजिप्तचे बडतर्फ राष्ट्राध्यक्ष मोहोम्मद मोर्सी यांच्या सुटकेसाठी त्यांच्या समर्थकांचा रक्तरंजित संघर्ष सुरूच आहे.

शुक्रवारी कैरोच्या रॅमसेस चौकात आंदोलनासाठी आलेल्या मोर्सी समर्थकांवर सुरक्षा पथकांनी केलेल्या बेछूट गोळीबारात 95 जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो जण जखमी झाले आहेत. त्यापूर्वी दोन दिवस आधी कैरोमध्ये निषेध छावण्या हटवताना झालेल्या संघर्षात 638 जणांचा मृत्यू झाला होता.

इजिप्तच्या सुरक्षा पथकांनी सध्या कैरोतील अल फतेह मशिदीला चारी बाजूंनी वेढा घातला आहे. रॅमसेस चौकाजवळ असलेल्या या मशिदीत हजारो मोर्सी समर्थक जमा आहेत. शुक्रवारी सुरक्षा पथके आणि मुस्लिम ब्रदरहूड समर्थकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर जवळपास एकहजार लोकांनी या मशिदीत आश्रय घेतला आहे.

लष्कराने महिलांना मशिदीतून बाहेर पडण्यास परवानगी दिली आहे. मात्र पुरुषांची चौकशी करायची असल्याने त्यांना मशिद सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. शुक्रवारच्या हिंसाचारात मृत्यू झालेल्या आंदोलकांना आणि जखमींना या मशीदीत आणण्यात आले आहे. मुस्लिम ब्रदरहूडने मशिदीतच तात्पुरते रुग्णालय सुरु केले आहे.

मशिदीतून आतून गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. काही जणांना मशिदीबाहेर पडायचे आहे. मात्र आक्रमक आंदोलक या लोकांना रोखत आहेत. लष्कराच्या कारवाईनंतर मुस्लिम ब्रदरहूड पक्ष अधिक आक्रमक झाला आहे. मोर्सी समर्थक आंदोलनाच्या नव्या रणनितीची योजना तयार करत आहेत. कैरोतील रॅमसेस चौक सध्या या आंदोलनाचे केंद्रबिंदू बनला आहे.