
आपल्यापैकी अनेकजण सणासुदीच्या काळात ऑनलाइन शॉपिंगला पसंती देतात. दसरा-दिवाळीच्या सुमारास ई-कॉमर्स कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर्स प्रदान करत असतात. दरम्यान अॅमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीने आपल्या मराठमोळ्या ग्राहकांच्या सोयीसाठी आता मराठीतही शॉपिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर आता विक्रेत्यांनाही मराठीत व्यवहार करता येणार आहेत. अॅमेझॉनच्या मार्केटप्लेसमध्ये आता विक्रेत्यांना मराठी, मल्याळम, तेलुगु आणि बंगाली या भाषांचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच त्यांचा व्यवहार पाहता येणार आहे.
अॅमझॉनवर आता मराठीतही करता येणार शॉपिंग
हे पाऊल आगामी सणासुदीच्या कालावधीच्या पार्श्वभूमीवर उचलण्यात आले आहे. ज्याच्या मदतीने अनेक विक्रेते, संभाव्य विक्रेते आणि नव्या विक्रेत्यांना आपला व्यवहार सुरू ठेवण्यासाठी निरनिराळ्या स्तरांच्या बाजारातून लाभ मिळेल. तसेच ते आपल्याला हव्या असलेल्या भाषेतूनही काम करू शकतील, असे अॅमेझॉनने एका निवेदनाद्वारे म्हटले आहे.
आता आपल्या ग्राहकांना आणि विक्रेत्यांना अॅमेझॉन मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली, कन्नड, मल्याळम, तेलुगु, तमिळ आणि इंग्रजी या भाषांमध्ये ऑनलाइन विक्री करण्याची आणि खरेदी करण्याची संधी देत आहे. या भाषांचा वापर करून पहिल्यांदा विक्रेता अॅमेझॉनच्या विक्रेत्याच्या रूपात रजिस्ट्रेशन करून ऑर्डर मॅनेज करण्यापर्यंतची कामे करू शकतात. अॅमेझॉनशी सद्यस्थितीत साडेआठ लाख विक्रेते जोडले गेले आहेत.
