देशाची कोरोनाच्या तिसऱ्या लाटेकडे वाटचाल; १२ राज्यांमधील प्रादुर्भावात झपाट्याने वाढ


नवी दिल्ली : एकीकडे कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही, त्यातच दुसरीकडे नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. देशात मागील चार दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या ३० हजारांच्या पुढे गेली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ ही तिसऱ्या लाटेचे लक्षण असल्याचे तज्ज्ञ सांगतात. काल दिवसभरात देशात ३०,७७३ कोरोनाबाधितांची नवीन प्रकरणे समोर आली आहेत, तर ३०९ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, ३८,९४५ बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

देशातील १२ राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे, देशाच्या विविध भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण हळूहळू वाढू लागले आहेत. सुमारे डझन राज्यांमध्ये, कोरोनाची दैनंदिन प्रकरणे एक हजाराच्या वर येत असल्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाली आहे. सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात तिसरी लाट येण्याचा अंदाजही तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. अशा परिस्थितीत देश हळूहळू तिसऱ्या लाटेच्या पकडीत येत आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मिझोरामसह अनेक राज्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येचा वेग वाढत आहे. केरळ अजूनही कोरोनाचे हॉटस्पॉट आहे. केरळमध्ये दररोज २० हजारांहून अधिक नवीन संक्रमित रुग्ण बाहेर येत आहेत.