सांगोला – महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदार संघाचे आमदार गणपतराव देशमुख यांनी वयाची ८६ वर्षे पूर्ण केली असून १० ऑगस्ट रोजी ८७ व्या वर्षात पदार्पण केले आहे. गणपतराव देशमुख हे या मतदार संघातून दहा वेळा निवडून आले असून त्यांची त्यासाठी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद झाली आहे. भारतात द्रविड मुन्नेत्र कळहम या पक्षाचे संस्थापक नेते एम. करुणानिधी हे आतापर्यंत विधानसभेत नऊ वेळा निवडून आले आहेत. पण गणपतराव देशमुख यांनी दहा वेळा विजय मिळवून करुणानिधी यांच्यावर मात केली आहे. विशेष म्हणजे गणपतराव देशमुख हे महाराष्ट्रात नामशेष होत चाललेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर विजयी होत आलेले आहेत.
विक्रमवीर आमदाराचा ८६ वा वाढदिवस
१९६२ साली पहिल्यांदा विजयी झालेल्या गणपतराव देशमुख यांनी त्या निवडणुकीसहीत १२ वेळा निवडणूूक लढविली. त्यापैकी १९७२ आणि १९९५ अशा दोन निवडणुकांमध्ये ते पराभूत झाले आणि १० वेळा निवडून आले. त्यांनी कधीही स्वार्थासाठी पक्ष बदलला नाही. १९७२ साली ते पराभूत झाले होते. त्यांचा पराभव करून निवडून आलेले आमदार दोनच वर्षात मरण पावले आणि १९७४ साली लगेच पोट निवडणूक झाली. तिच्यात गणपतराव पुन्हा निवडून आले. वयाच्या ८७ व्या वर्षी ते अजूनही आमदार आहेत आणि दिवसाचे १४ ते १५ तास काम करत असतात. विधानसभेत नियमाने हजर असतात.
५० वर्षांच्या आमदारकीच्या कारकिर्दीत त्यांच्या वाट्याला दोन वेळा मंत्रिपदसुध्दा आले. १९७९ साली श्री. शरद पवार यांच्या पुलोदच्या मंत्रिमंंडळात श्री. गणपतराव देशमुख हे दीड वर्षे कायदा मंत्री होते. त्यानंतर १९९९ साली श्री. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात चार वर्षे तर श्री.सुशील कुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात एक वर्षे अशी पाच वर्षे ते पणन मंत्री होते. त्याशिवाय १९९५ साली ते शहाजीराव पाटील या कॉंग्रेसच्या उमेदवाराकडून ते निसटत्या मताधिक्क्याने पराभूत झाले असले तरी त्यावर्षी त्यांच्याकडे एस.टी.महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. त्यांचा ८६ वा वाढदिवस दहा ऑगस्ट रोजी सांगोल्यामध्ये साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.
