कॅलिफोर्निया – अमेरिकन इंटरनेटच्या माध्यमामधून पाळत ठेवण्याचा गुप्त कार्यक्रम जगासमोर मांडणार्या एडवर्ड स्नोडेन याला रशियाने आश्रय दिल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी रशियावर टीका
केली असून, स्नोडेनला आश्रय देणे ही त्यांची चूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
स्नोडेनला आश्रय देत रशियाने चूक केली
राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचा माजी कंत्राटदार एडवर्ड स्नोडेन याला रशियाने सुरक्षित आश्रय घेऊ दिल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आज (बुधवार) निराशा व्यक्त केली. स्नोडेन याला स्वाधीन करण्याच्या ओबामा प्रशासनाच्या विनंतीनंतरही रशियाने हे पाऊल उचलल्यानंतर याआधीही अमेरिकेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
ओबामा हे येत्या सप्टेंबर महिन्यात रशियाला भेट देणार आहेत. मात्र, आता त्यांच्या रशिया भेटीवर स्नोडेन प्रकरणाने प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. रशियाने या प्रकरणात बजावलेली भूमिका पाहता ओबामा व रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यामधील प्रस्तावित भेटीची उपयुक्तता किती असेल, असा प्रश्न अमेरिकेने काही दिवसांपूर्वी उपस्थित केला होता. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी व संरक्षण मंत्री चक हेगेल हे आज अमेरिकेत रशियाचे परराष्ट्र मंत्री व संरक्षण मंत्री यांची भेट घेणार आहेत.
