कमलनाथांनी बचाव केला अँटोनींचा; यशवंत सिन्हा आक्रमकच

नवी दिल्ली – मंगळवारी पाकिस्तानने केलेल्या अपरात्रीच्या हल्ल्यात पाच भारतीय जवान शहीद झाले असताना, भारत सरकारमधील मंत्री मात्र एकमेकांचा बचाव करण्यात आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. काल या हल्ल्याविषयी लोकसभेला माहिती देताना देशाचे संरक्षण मंत्री म्हणाले की, हा हल्ला पाकिस्तानी सैन्याकडून नव्हे तर पाक सैनिकांच्या वेषात आलेल्या 20 दहशतवाद्यांनी केला आहे.

यावर टीका करताना भारतीय जनता पक्षाचे नेते यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे की, ते पाकचे सैनिक नसून दहशतवादी असल्याचे अँटोनी यांना दिल्लीत बसून कसे समजले? पाकिस्तानने दिलेल्या दिशाभूल करणार्‍या माहितीला भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी दुजोरा कसा काय दिला? सिन्हा यांनी संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य हास्यास्पद असल्याची टीका केली आहे. सिन्हा यांनी सभागृहात विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली.

भाजप सदस्यांनी प्रश्‍नोत्तराचा तास स्थगित करण्याची नोटीस दिली होती. दरम्यान, अँटोनी यांच्या गैरहजेरीत केंद्रीय मंत्री कमलनाथ यांनी त्यांचा बचाव करताना विशेषाधिकार भंगचे हे प्रकरण नसल्याचे म्हटले. संरक्षण मंत्र्यांना त्यावेळी जी माहिती मिळाली होती, त्या आधारावर त्यांनी वक्तव्य केले होते. संरक्षण मंत्री देशाची दिशाभूल करीत नसल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, भारतीय लष्करप्रमुख जनरल विक्रमसिंग जम्मू येथे पोहोचले असून शहिदांचे पार्थिव त्यांच्या घरी पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे. तसेच अँटोनी यांनी आज (बुधवारी) पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन त्यांना सर्व परिस्थितीची माहिती दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणींनी संसद भवनाच्या प्रांगणात पत्रकारांना सांगितले की, संरक्षण मंत्री अँटोनी यांनी देशाची माफी मागितली पाहिजे. त्यांनी पाकिस्तानधार्जिणे वक्तव्य करून शहिदांचा अपमान केला आहे.

पूंछ येथील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील पाक उच्चायुक्तांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी करत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे कठोर कारवाईची मागणी केली. त्याआधी दोन्ही देशांतील तणाव निवळण्यासाठी सैन्यदलाच्या अधिकार्‍यांनी एकमेकांशी हॉटलाईनवरून संपर्क साधला.

Leave a Comment