इंडोनेशियातील बुद्ध मंदिरात बॉम्बस्फोट

जकार्ता – इंडोनेशियाच्या राजधानीतील जकार्ता येथील एका बुद्ध मंदिरात काल सौम्य बॉम्बस्फोट झाला. त्यात तीन लोक जखमी झाले. याचवेळी तिथे आणखी एक स्फोट व्हावा यासाठी बॉम्ब ठेवण्यात आला होता, परंतु त्याचा स्फोट झाला नाही. त्यातून केवळ धूरच बाहेर पडला. इंडोनेशियात बौद्ध लोक मोठ्या संख्येने राहतात. त्यामुळे अशा स्फोटातून बौद्ध विरुद्ध मुस्लीम असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे या बॉम्बस्फोटाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. या बॉम्बस्फोटसाठी वापरण्यात आलेल्या आवरणावर, हा म्यानमारमधील रोहिंगीया मुस्लिमांच्या आक्रोशाचा प्रतिसाद आहे, असे लिहिलेले होते.

म्यानमारमधील रोहिंगीया मुस्लीम आणि तिथे बौद्ध धर्मिय यांच्यात दंगली सुरू आहेत. मात्र त्या देशात रोहिंगीया मुस्लीम हे संख्येने अतीशय कमी असल्यामुळे या दंगलींनी त्यांची कोंडी झालेली आहे. हे मुस्लीम आता आग्नेय आशियातल्या काही देशांकडे पळून जात असून तिथे आश्रय घेत आहेत. त्यामुळे आग्नेय आशियातल्या काही देशांमध्ये या रोहिंगीया मुस्लिमांच्या परिस्थितीचे पडसाद उमटण्याची शक्यता होतीच. ती इंडोनेशियात उमटली आहे.

इंडोनेशियात या संघर्षाचे लोण पसरावे आणि म्यानमारमधील बौद्धांवर दबाव यावा या दृष्टीने इंडोनेशियातील काही मुस्लीम संघटनांनी हे स्ङ्गोट घडवले असले तरी त्यांचा परिणाम इंडोनेशियातल्या सामाजिक जीवनावर होणार नाही असा विश्‍वास धार्मिक कार्यमंत्री सूर्यधर्म अली यांनी व्यक्त केला आहे. इंडोनेशियातील बौद्ध आणि मुस्लीम एकदिलाने नांदत आहेत आणि त्यांच्यात कसलाच वाद नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.