ध्यानचंद यांना भारत रत्न देण्याची शिफारस

नवी दिल्ली – दिवंगत हॉकीपटू ध्यानचंद यांना त्यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या देदिप्यमान कामगिरीबद्दल देशातला सर्वोच्च भारत रत्न किताब देण्यात यावा अशी शिफरस केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाकडे केली आहे. केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री जितेंद्रसिंग यांनी संसदेत प्रश्‍नोत्तराच्या तासाला ही माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून भारतातल्या क्रिकेटप्रेमींकडून सचिन तेंडुलकर याला भारत रत्न किताब देण्याची मागणी होत आहे. परंतु क्रीडा मंत्रालयाने त्याचे नाव न सुचवता कै. ध्यानचंद यांचे नाव सुचवले असून तेंडुलकर आणि ध्यानचंद या दोघांमध्ये ध्यानचंद यांच्या नावाला महत्व दिले आहे.

क्रीडा खात्याला भारत रत्न किताबासाठी एका खेळाडूचे नाव सुचविण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार बजावत या मंत्रालयाने १९८९ साली निधन पावलेल्या आणि तीन वेळा भारताला ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणार्‍या ध्यानचंद यांच्या नावाची सूचना केली आहे. याचा अर्थ क्रीडा खाते सचिन तेंडुलकरची किंमत कमी समजते असा होत नाही, असा खुलासाही जितेंद्रसिंग यांनी केला.

क्रीडा खात्याचे सचिव प्रदीप देव यांनीही ध्यानचंद यांच्या नावाची सूचना करण्यामागचे कारण विषद केले. आपल्या खात्याने ध्यानचंद यांच्या नावाने काही पुरस्कार जाहीर केलेले आहेत. ध्यानचंद हा क्रीडा क्षेत्रात अनेक आख्यायिकांचा विषय झालेला आहे. अशा व्यक्तीला भारत रत्न देणे योग्य आहे असे आपल्याला वाटते, असे ते म्हणाले. ध्यानचंद यांनी भारताला १९२८, १९३२ आणि १९३६ अशा तीन ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सलग सुवर्णपदके मिळवून दिलेली होती. अजून तरी जगातले अनेक क्रीडापटू ध्यानचंद यांना जगातला सर्वात उत्तम हॉकीपटू समजतात.

सचिन तेंडुलकरच्या भारत रत्नची चर्चा सुरू झाल्यानंतर हॉकी इंडिया या संघटनेने ध्यानचंद यांनाही भारत रत्न किताब देण्यात यावा, अशी मागणी केली होती. तिथून ध्यानचंद यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आणि आता तर त्यांच्या कामगिरीचे तपशील कळल्यानंतर सचिनपेक्षा ध्यानचंद यांनाच आधी भारत रत्न किताब द्यावा, अशा निष्कर्षाप्रत सर्वजण आले आहेत.

Leave a Comment