
नाशिक : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत चिथावणीखोर वक्तव्य केल्यानंतर शिवसेना विरुद्ध नारायण राणे वाद चिघळण्यास सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. दरम्यान, नाशिक पोलिसांकडून मुख्यमंत्र्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश देण्यात आले असून नारायण राणे यांना आजच अटक करुन न्यायालयासमोर हजर केले जाऊ शकते. दरम्यान, नारायण राणे यांची जीभ जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना घसरली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कानशिलात लगावण्याचे वक्तव्य केले होते.
मुख्यमंत्र्यांबाबतच्या चिथावणीखोर वक्तव्यानंतर नाशिकामधील भाजप कार्यालयावर शिवसेना कार्यकर्त्यांकडून दगडफेक
नारायण राणेंविरोधात नाशिकमध्ये शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढले आहेत. सध्या नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. काल रायगडमधील महाड येथे या यात्रेदरम्यान त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला, तसेच मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना त्यांची जीभही घसरली. त्यांच्या याच वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात नाशिक आणि महाडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
