केंद्रात आमचे सरकार आहे, राज्याची उडी कितपत जाते ते पाहुया; नारायण राणेंचा सूचक इशारा


महाड : नारायण राणे आणि शिवसेनेतील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचलेला असताना नारायण राणेंना मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्याप्रकरणी अटक होणार का? याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच नारायण राणे यांनी आज संभाव्य अटकेबाबत माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली.

माझ्याकडून कोणताही गुन्हा झालेला नाही, गुन्हा नोंदवण्यासारखे माझे वक्तव्य नाही, मला अशा कोणत्याही गुन्ह्याची कल्पना नसल्यामुळे ऐकीव माहितीवर मी बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे. प्रसाद लाड यांनी जेव्हा शिवसेना भवनाबाबत वक्तव्य केले होते, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी थापड देऊ, असे वक्तव्य केले होते. त्यावर गुन्हा का दाखल झाला नाही, असा प्रतिसवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच केंद्रात आमचे सरकार आहे, राज्याची उडी कितपत जाते ते पाहुया, असा सूचक इशाराही नारायण राणे यांनी दिला आहे.

नारायण राणे बोलताना पुढे म्हणाले की, मी माहितीच्या आधारे एकही उत्तर देणार नाही. कोणता गुन्हा माझ्याविरोधात दाखल झाला, याची मला माहिती नाही, माझ्याकडून कोणताही गुन्हा झालेला नाही, तुम्ही तपासून पाहा आणि मग आपापल्या टिव्हीवर दाखवा. नाहीतर माझी तुमच्याविरोधात केस दाखल होईल. गुन्हा केलेला नसताना पथक निघाले आहे, अटक होणार असल्याचे दाखवले जात आहे. तुम्हाला काय सामान्य माणूस वाटला काय ? उगाच कोणाचेही नाव सांगता, शिवसेना… कोण शिवसेना? एखाद्याचे नाव सांगा, नेत्याचे नाव सांगा. मी कोण बडगुजर ओळखत नाही. जर माझी बदनामी माध्यमांनी करायला घेतली, तर माझ्याकडून माध्यमांवर गुन्हा दाखल केला जाईल. माध्यमांच्या बातम्यांवर, सांगण्यावर मी विश्वास ठेवणार नाही. आम्ही समर्थ आहोत. जे दगड मारून गेले, त्याला पुरुषार्थ म्हणत नाही. त्यांना जे काही करायचे आहे ते करु देत, त्याला आम्ही पाहून घेऊ.

जेव्हा शिवसेना भवनाबाबत प्रसाद लाड यांनी वक्तव्य केले होते, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी थप्पड देऊ असे म्हटले होते. त्या वक्तव्यावर गुन्हा का दाखल झाला नाही? त्यांचे वक्तव्य माध्यमांनीही दिवस-रात्र का दाखवले नाही ? 15 ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्य दिन मुख्यमंत्री असतानाही त्यांना माहीत नाही, त्यावेळी मी असतो तर, असे म्हणालो होतो. असतो तर… म्हटेल म्हणजे तो अपराध होत नाही. जर मी आता कानफाड फोडीन असे म्हणालो असतो, तर तो अपराध झाला असता. जरा समजून घ्या, असे म्हणत नारायण राणे यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले.