अयोध्या राममंदिर मार्गाला कल्याणसिंग यांचे नाव

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेश सरकारने एक महत्वाची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी कल्याणसिंग यांचे अंत्यसंस्कार झाल्यावर घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदेत अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिर मुख्य मार्गाला कल्याणसिंग यांचे नाव दिले जाणार असल्याचे जाहीर केले.

मौर्य म्हणाले अयोध्येत राममंदिर आंदोलनात तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंग यांची प्रतिबद्धता लक्षात घेऊन हा निर्णय घेतला गेला आहे. रामजन्म भूमी आणि राम मंदीर उभारणी यात कल्याणसिंग यांचे योगदान फार मोठे आहे. ते स्वतः रामभक्त होते. राममंदिर मार्गाला कल्याणसिंग यांचे नाव हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे.

अयोध्येशिवाय लखनौ, प्रयागराज, बुलंद शहर, अलीगढ या शहरातील एका मार्गाला सुद्धा कल्याणसिंग यांचे नाव दिले जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग या संदर्भातील घोषणा लवकरच करेल असे समजते.

भाजप नेते आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग त्यांचे शनिवारी निधन झाले होते. त्यांनी दोन वेळा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा कल्याणसिंग हेच मुख्यमंत्री होते. त्यांनी राजस्थानचे राज्यपाल म्हणूनही काम केले होते. राममंदिर प्रश्नी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.