
टोकियो – एक रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकणाऱ्या भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचे वेध लागले होते. रवीकुमार दहियाचा पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये ५७ किलो वजनी गटात अंतिम सामना रशियन ऑलिंपिक कमिटीच्या जावूर युगुयेवशी झाला, पण आपला अनुभव पणाला लावत युगुयेवने ही लढत ७-४ने जिंकली. तर रवीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले असून भारताच्या खात्यात अजून एका पदकाची नोंद झाली आहे. उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या सनायेव नुरिस्लामचा पराभव करून रवीने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. रवीला हा विजय फॉल रूलद्वारे मिळाला. म्हणजे त्याने नूरिस्लामला सामन्यातूनच बाहेर फेकले होते.
Tokyo Olympics : पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये रवी दहियाला रौप्यपदक
सध्या रवी आणि युगुयेवे दोघेही उत्कृष्ट फॉर्ममध्ये होते. यापूर्वी या दोघांची भेट २०१९च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये झाली होती. त्यानंतर रशियन पैलवानाने भारतीय कुस्तीपटूला चुरशीच्या सामन्यात ६-४ने पराभूत केले. या स्पर्धेत रवीला कांस्यपदक मिळाले. रवीने २०२० आणि २०२१ आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर त्याने २०१८ च्या अंडर-२३ चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले.
२०१८ आणि २०१९ वर्ल्ड चॅम्पियनशिप द्वितीय मानांकित युगुयेवने जिंकली. त्याला रशियन ऑलिंपिक कमिटीच्या सर्वोत्तम कुस्तीपटूंपैकी एक मानले जाते. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत १५ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये १४ पदके जिंकली आहेत. यापैकी १२ सुवर्णपदके आहेत. मात्र, टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याला काही कठीण सामन्यांना सामोरे जावे लागले. उपांत्य फेरीत त्याने इराणच्या रझा अत्रिनाघर्चीनीचा सहज पराभव केला.
