अमृता फडणवीस यांनी पुण्यात केली आपल्या नव्या गाण्याची घोषणा; या दिवशी होणार रिलीज


पुणे – कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असल्यामुळे राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यांना राज्य सरकारने ही सूट दिली आहे. तर ११ जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. यात पुणे शहर आणि अन्य जिल्ह्यांचाही समावेश असल्यामुळे सरकारविरोधात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. मुंबईतील निर्बंध सरकारने शिथिल केलेले असताना पुण्यात का कायम ठेवले? असा सवालही केला जात असून, अमृता फडणवीस यांनी याच मुद्द्यावरून पुणेकरांना धरणे आंदोलन करण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी आपले नवीन गाणे येत असल्याचीही घोषणा केली आहे.

गुरूवारी पुण्यात एका कार्यक्रमाला अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. पुण्यात धागा हॅन्डलूम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, अमृता फडणवीस यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन झाले. त्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, पुण्यात कोरोनाबाधितांचा दर ४ असून, तरी देखील मॉल्स आणि इतर सर्व बंद ठेवण्यात आले आहे. नागरिकांना चारपर्यंतची वेळ पुरेशी नाही. त्यामुळे रस्त्यावर गर्दी होत आहे. वेळ अधिकची देण्यात आली असती, तर नागरिकांनी गर्दी केली नसती. पण नागरिकांनी नियम पाळून खरेदी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच मुंबईत डेथ रेट अधिक असतानाही तिथे एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? त्यामुळे प्रशासनाने जागे होण्याची गरज असून, नागरिकांनी धरणे आंदोलन करण्याची आवश्यकता आहे. तसेच एक धोरण तयार करून आता पुण्यात अधिक मोकळीक देण्याची वेळ आली असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

यावेळी अमृता फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. आता कोणते गाणे येणार आहे अशी विचारणा करण्यात आली असता, अमृता फडणवीस म्हणाल्या, माझे एक गाणे गणेश चतुर्थीच्या आधी येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर त्यांना गाणे सादर करण्याचा आग्रह करण्यात आला. त्यावर अमृता फडणवीस (स्टेजकडे बोट करीत) म्हणाल्या, मी तिथे म्हटले असते, येथे ही वेळ नाही. तुम्ही मला एकदम सिरीयस प्रश्न विचारता आहात. पुढील वेळी हलके फुलके विचाराल, तेव्हा बघू… पुढच्या वेळी १०० टक्के नक्की, असे त्यांनी म्हटले.