होशियारपूर दि.२६ – पंजाब राज्यातील तुरूंगातून तरूण कैदी सर्रास स्मार्टफोन आणि सोशल मिडिया साईटचा वापर करत असून त्यातही फेसबुकच्या माध्यमातून तुरूंगाबाहेर सहज संपर्क प्रस्थापित करत आहेत. इतकेच नव्हे तर अन्य कैदी, तुरूंगातील बराकी, तुरूंगाची अंतर्गत व्यवस्था यांचे फोटोही फेसबुकवर लोड करत असल्याचे दिसून आले आहे. हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय धोकादायक आहे कारण याच तुरूंगातून अनेक पाकिस्तानी कैदी तसेच पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय शी संबंधित अनेक गुन्हेगार कैदीही आहेत.
ही तरूण कैदी पोरे तुरूंगातल्या आपल्या जीवनक्रमाबद्दल बाहेरच्या मित्रांना नातेवाईकांना माहिती देत आहेतच पण बाहेरूनही त्यांच्याकडे जामीन मिळतोय का, बाहेर कधी येणार असे प्रश्न विचारले जात आहेत. कपूरथळा, पतियाळा, लुधियाना आणि होशियारपूर या मोठ्या तुरूंगातून हा प्रकार सर्रास सुरू आहे. मात्र यामुळे पाकिस्तानी हस्तक याचा दुरूपयोग करून तुरुगाबाहेरच्या हस्तकांना आतील सर्व माहिती कळवू शकतात याचा विचार होणे गरजेचे असल्याचे मत ही व्यक्त केले जात आहे.
पंजाबचे अतिरिकत पोलिस महासंचालक मीना यांनी या प्रकाराबाबत माहिती नसल्याचे सांगितले आहे तर कपूरथळा जेल सुपरिटेंडेंट औलक यांनी तुरूंगात चार हाजारावर कैदी असल्याने प्रत्येकावर नजर ठेवणे अवघड असल्याचा खुलासा केला आहे. जेल मॅन्युअल प्रमाणे कैद्यांना फोनचा वापर करून बाहेर संभाषण करता येत नाही. २०१२ मध्ये पंजाब जेल विभागाने महिन्यातून एकदा कुटुंबियांना फोन वरून संफ करण्यासाठी फोन सुविधा सुरू केली आहे.