नवी दिल्ली दि.२६ – आयएचएस ऑटोमोटिव्ह या जागतिक मार्केट इन्फरर्मेशन प्रोव्हायडर संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार २०१६ पर्यंत भारत वाहन बाजारात जर्मनी, जपान व ब्राझीलला मागे टाकून जगात तीन नंबरचा वाहन बाजार बनेल असा अंदाज वर्तविला गेला आहे.

या सर्वेक्षणात असे नमूद केले गेले आहे की २०११ व २०१२ या दोन वर्षात भारताच्या आर्थिक विकासाचा दर कमी राहिला असला आणि त्याचा परिणाम वाहन विक्रीवर होत असला तरीही २०१४ पासून भारताचा आर्थिक विकास दर चांगला वाढेल आणि २०१६ पर्यंत वाहन बाजारात भारत तिसर्या क्रमांकावर पोहोचेल. या संस्थेचे वरीष्ठ अर्थतज्ञ चार्लस चेसबरो यांच्या म्हणण्यानुसार २०१२ पर्यंत वाहन बाजार क्षेत्रात चीन, अमेरिका व जपान हे पहिल्या तीन क्रमांकात होते तर ब्राझील, जर्मनी यांच्यानंतर भारत ६ व्या स्थानावर होता.
भारत सरकारच्या गुंतवणूक सुधारणावादी कार्यक्रमामुळे स्थानिक तसेच परदेशी एन्टरप्रायझेसना व्यवसायासाठी अनुकुल वातावरण निर्माण होत आहे. भारताचे हलक्या प्रकारच्या वाहनांचे उत्पादनही २०२० पर्यंत ७ दशलक्षांवर जाण्याचे संकेत मिळत आहेत. भारतातील मध्यमवर्ग हा भविष्यतील मोठा वाहन ग्राहक वर्ग असणार आहे. परिणामी वाहन उत्पादक कंपन्या चीन, भारत, ब्राझील व अन्य विकसनशील देशांवर आपल्या उद्योगासाठी अधिक लक्ष केंद्रीत करत आहेत. भारतात लक्झरी आणि प्रिमियम श्रेणीतील गाड्यांना अधिक मागणी असेल असेही या सर्वेक्षणात म्हटले गेले आहे.