डान्सबार परवानगीसाठी पोलिस मुख्यालयाकडे गर्दी

मुंबई/ पुणे दि.२६- सुप्रीम कोर्टाने महाराष्ट सरकारने राज्यातील डान्सबार वर घातलेली बंदी अवैध ठरविल्यानंतर मुंबईतील कांही प्रसिद्ध डान्सबार मालकांसह ३५० पेक्षा अधिक बारमालकांनी डान्सबार साठी परवानगी अर्ज देण्याची तयारी केली असून हे अर्ज येत्या दोन दिवसांत पोलिस मुख्यालयाकडे सादर केले जाणार असल्याचे समजते.

राज्य शासनाने डान्सबारवर बंदी घातल्यानंतर कांही बार मालकांनी आर्केस्ट्रा बार म्हणून हे बार सुरू ठेवले होते तर अनेकांनी बार बंद केले होते. याविषयी सांगताना डान्स बार कमिटी ऑफ इंडियन हॉटेल्स, रेस्टॉरंट असोसिएशनचे वकील अनिल गायकवाड म्हणाले की सुप्रीम कोर्टानेच बंदी उठविल्यामुळे आता आर्केस्ट्रा बारही परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्स बार पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत आहेत.

मुद्रांक शुल्क घोटाळ्यातील महत्त्वाचा आरोपी तेलगी ज्या डान्सबारचा नेहमीचा ग्राहक होता, त्या टोपाझ सह कार्निव्हल, नाईट लव्हर, सनशाईन या सारख्या मोठ्या बारनही परवान्यासाठीचे अर्ज भरले आहेत. सरकारने कोणत्याही परिस्थितीत डान्स बार पुन्हा सुरू होऊ देणार नाही अशी प्रतिज्ञा करून कायद्यात दुरूस्ती करण्याची तयारी चालविली असली तरी सध्या तरी या बारना परवानगी देणे भाग पडणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. डान्सबार साठी परवाना फी महिन्याला १५ हजार तर वर्षाला १ लाख ८० हजार इतकी आहे.

डान्सबार पुन्हा सुरू होणार या आशेने बारबालाही मुंबईसह अन्य मोठ्या शहरांकडे पुन्हा वळू लागल्या असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment