क्रमिक पुस्तकात दहशतवाद्याची कविता

कालिकत – केरळातल्या कालिकत विद्यापीठातल्या एका क्रमिक पुस्तकात अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या सदस्याची कविता समाविष्ट करण्यात आली असून तिच्यामुळे नाराजी पसरली आहे. ही कविता काढून टाकावी अशी मागणी समाजाच्या काही घटकांकडून आली आहे. अल कायदा ओसामा बिन लादेनच्या संघटनेच्या अरबी देशांतल्या शाखांचा प्रमुख असलेल्या इब्राहिम अल रुबाईश या नेत्याची, ओडे टू सी ही कविता बी.ए. च्या दुसर्‍या वर्गाला अभ्यासासाठी लावण्यात आलेल्या कविता संग्रहात समाविष्ट करण्यात आली आहे.

२००१ साली रुबाईश याला पाकिस्तान आणि अङ्गगाणिस्तान यांच्या सीमेवर संशयास्पद रित्या वावरताना पकडण्यात आले होते. त्यानंतर त्याला अमेरिकेने ग्वाटेनामो बे या तुरुंगात सहा वर्षे डांबले होते. तिथे त्याने अनेक कविता केल्या आणि लेखन साहित्य न मिळाल्याने त्या कारागृहाच्या भिंतीवर लिहून ठेवल्या. २००६ साली त्याची सुटका झाली. कमला दास, पाब्लो नेरुडा, सिल्व्हिया पथ या कवींचा समावेश असलेल्या काव्यसंग्रहात रुबाईश याचीही कविता समाविष्ट करण्यात आली आहे.

या संग्रहात रुबाईश याचा परिचयही देण्यात आला असून त्याच्याविषयी गौरवास्पद उल्लेख करण्यात आला आहे. रुबाईश हा अल कायदा या संघटनेचा वैचारिक मार्गदर्शक समजला जात होता. त्याची ही कविता काढून टाकण्यात यावी अशी मागणी होत आहे.