
नवी दिल्ली : जगभरातील सर्वच देशांनी आपापल्या देशातील कोरोना लसीकरणाची गती वाढवावी, अन्यथा डेल्टा व्हेरिएंट अधिक जीवघेणा ठरु शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. सर्वांनीच डेल्टा व्हेरिएंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवा, अन्यथा जगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.
..अन्यथा जगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता; WHO चा इशारा
सर्वच देशांनी या वर्षाच्या सप्टेंबर अखेर आपल्या किमान 10 टक्के नागरिकांना लस मिळेल यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. तसेच या वर्षाच्या अखेरपर्यंत जगभरातल्या 40 टक्के लोकांना लस मिळण्याची आवश्यकता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. येत्या 2022 सालापर्यंत जगभरातील 70 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण व्हावे अशी अपेक्षाही जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.
जगभरातील 132 देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंट या जीवघेण्या कोरोनाच्या प्रकाराचा प्रसार झाला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केल्यामुळे याचा अधिक प्रसार होण्याआधीच सर्वांनी काळजी घेऊन यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करायला हवा, असे आवाहन करण्यात आले आहे.
डेल्टा व्हेरिएंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी लसीकरणासोबतच सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात याव्यात. त्यामध्ये फेस मास्क, सोशल डिस्टन्सिंग, योग्य आहार, स्वच्छता आणि गर्दीचे ठिकाण टाळणे या गोष्टींचे पालन करण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.
