नरेंद्र मोदी यांना ‘चहावाला’ म्हणण्यापेक्षा ‘चहावाल्याचा मुलगा’ म्हणा; प्रल्हाद मोदी


उल्हासनगर : उल्हासनगर ट्रेड असोसिएशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी हे आज उल्हासनगरला आले होते. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चहावाला’ म्हणण्यापेक्षा ‘चहावाल्याचा मुलगा’ म्हणा, असे म्हणत पत्रकारांना चिमटे काढले. आम्ही सर्व भावंडांनी चहा विकला, पण ज्याचा मुकुट मोठा, पत्रकार त्यालाच चालवतात, असे प्रल्हाद मोदी म्हणाले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चायवाला’ म्हणण्यापेक्षा ‘चायवाले का बेटा’ म्हणा, असे यावेळी प्रल्हाद मोदी म्हणाले. आम्ही सर्व भावंड मिळून चहा विकायचो. ज्यादिवशी ज्याचा नंबर लागेल, त्याच्यावर चहा विकायची जबाबदारी यायची. पण चहावाला आम्ही नव्हतो, तर आमचे वडील होते. त्यामुळे आम्ही सर्व ‘चायवाले के बेटे’ आहोत, असे ते म्हणाले.

आम्हा 6 भावंडांना आमच्या वडिलांनी चहा विकून मोठे केले, पण पत्रकार नरेंद्र मोदींना ‘चहावाला’ म्हणतात, ही त्यांची चूक असून म्हणायचे असेल, तर त्यांना ‘चहावाल्याचा मुलगा’ म्हणा, असे प्रल्हाद मोदी म्हणाले. त्यामुळे प्रल्हाद मोदींनी चिमटा नेमका पत्रकारांना घेतला, की स्वतःला ‘चहावाला’ म्हणवून घेणाऱ्या नरेंद्र मोदींनाच घेतला? अशी कुजबुज सभागृहात रंगली होती.

तुम्ही रेफ्युजी म्हणत अजून किती दिवस रडत बसणार आहात? एकीचे बळ दाखवा आणि आता लढायला शिका. जीएसटी भरायला सामूहिकरित्या नकार द्या, मग बघा उद्धव ठाकरेच नव्हे, तर नरेंद्र मोदीही तुमच्याकडे येतील, असे आवाहन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान भाऊ प्रल्हाद मोदी यांनी उल्हासनगरच्या व्यापाऱ्यांना केले.

ऑल इंडिया फेअर प्राईझ शॉप असोसिएशनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान भाऊ प्रल्हाद मोदी हे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. मागील दोन वर्षात लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागले आहे. अशात सरकारी पातळीवरून कुठलीही मदत मिळत नसल्यामुळे आपला आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी उल्हासनगर ट्रेड असोसिएशन या व्यापाऱ्यांच्या संघटनेने प्रल्हाद मोदी यांना निमंत्रित केले होते.

व्यापाऱ्यांनी या कार्यक्रमात आपल्या समस्या प्रल्हाद मोदी यांच्याकडे व्यक्त केल्या. तसेच केंद्र सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याची मागणी केली. उल्हासनगर शहर हे निर्वासितांचे शहर असून या शहराला सरकारने विशेष निधी द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावर बोलताना रेफ्युजी म्हणून किती दिवस रडणार आहात? आता लढायला शिका, असे आवाहन प्रल्हाद मोदी यांनी केले.

ते म्हणाले की, तुमच्या शहराचा विकास होत नसेल आणि सरकारचे लक्ष वेधायचे असेल, तर सामूहिकपणे जीएसटी भरायला नकार द्या, मग पहा, उद्धव ठाकरेच नव्हे, तर नरेंद्र मोदीही तुमच्याकडे येतील, असे वक्तव्य प्रल्हाद मोदी यांनी केले. तर यानंतर आम्ही जीएसटी केंद्राला भरतो, त्यामुळे आम्ही केंद्रालाच जाब विचारणार, अशी भूमिका उल्हासनगर ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती यांनी स्पष्ट केली.

उल्हासनगरातील अनेक व्यापाऱ्यांवर लॉकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पँडेमिक ऍक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इतर राज्यांनी हे गुन्हे मागे घेतले असल्यामुळे महाराष्ट्रातही हे गुन्हे मागे घेतले जावेत, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. या कार्यक्रमाला उल्हासनगरमधील सर्व व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तर खुद्द पंतप्रधानांचे भाऊ येणार असल्यानं पोलिसांनी अतिशय कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवली होती.