उद्यापासून लागू होणार RBI चे नवीन नियम; ATM मधून रोकड काढणे होणार महाग


मुंबई : उद्यापासून डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे काढणे महाग होणार आहे. आरबीआयने नवीन नियम लागू केले असून एटीएममधून रोकड काढणे उद्यापासून (1 ऑगस्ट) महाग होणार आहे. सर्व बँकांच्या एटीएमवरील आर्थिक देवघेवींवरील सध्याची इंटरचेंज फी 15 रुपयांवरुन वाढवून आरबीआयने ती 17 रुपये केली आहे. त्याचप्रमाणे गैर आर्थिक म्हणजे नॉन फायनान्शियल ट्रान्जेक्शनसाठी असणारी फी 5 रुपयांवरुन 6 रुपये करण्यात आली आहे.

उद्यापासून म्हणजे 1 ऑगस्टपासून आरबीआयचे हे नवीन नियम लागू होणार आहेत. त्यामुळे आता सामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागण्याची शक्यता आहे. सध्या मेट्रो शहरात महिन्याला तीन ट्रान्जेक्शन आणि इतर शहरात पाच ट्रान्जेक्शन फ्री देण्यात येत आहेत. त्यावरील ट्रान्जेक्शनवर पैसे आकारण्यात येतात. जून 2019 साली आरबीआयने इंडियन बँक असोसिएशनचीच्या प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्या समितीने केलेल्या शिफारसींच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

पाच ट्रान्जेक्शन सध्या बॅंकाकडून ग्राहकांना फ्री देण्यात येतात. त्यामध्ये जर वाढ झाली, तर ग्राहकाला 20 रुपये कस्टमर चार्ज लावण्यात येतो. आता या कस्टमर चार्जमध्ये एका रुपयाची वाढ करण्यात आली असून तो 21 रुपये एवढा करण्यात आला आहे. आरबीआयने हा चार्ज आता नवीन चार्ज कॅश रिसायक्लिंग मशिनवरही लावला आहे. हा नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू करण्यात येणार आहे.

आयसीआयसीआय बँकेचा विचार करता या बॅकेंच्या महिन्यातील पहिल्या चार ट्रान्जेक्शनवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत तर पाचव्या ट्रान्जेक्शनसाठी तब्बल 150 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. फायनान्शियल ट्रान्जेक्शन म्हणजे पैसे काढणे, किंवा पैशाचा व्यवहार करणे होय तर नॉन फायनान्शियल ट्रान्जेक्शन म्हणजे आपल्या खात्यावरील बॅलेन्स चेक करणे किंवा तशा प्रकारची कामे होय.