
– फ्लाईंग शीख मिल्खासिंग यांच्या जीवनावर आधारित असलेला “भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात अध्यादेशही काढण्यात आला आहे. आता संपूर्ण महाराष्ट्रातील मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिन थिएटरमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री दाखवण्यात येणार आहे. ‘भाग मिल्खा भाग’ हा केंद्र सरकारच्या राष्ट्रीय फिल्म विकास निगम (एनएफडीसी) उपक्रमातर्फे सहनिर्मित आहे. तरुण पिढीला प्रेरणा देणे तसेच क्रिडा क्षेत्रात आवड निर्माण करणे, हा या चित्रपटाचा मुख्य हेतू आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या संपूर्ण टीमने ‘भाग मिल्खा भाग’ टॅक्स फ्री करण्याची मागणी केली होती.
