जम्मू – रामबन जिल्ह्यातील सीमा सुरक्षा दलाच्या ( बीएसएफ) शिबीरावर काही स्थानिकांनी गुरुवारी दगडफेक केली. हा संतप्त जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात तीन जणांचा मृ्त्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. यात एका सुरक्षा रक्षकाचाही समावेश आहे. जम्मू येथील धरम भागात गुरुवारी पहाटे एक वाजता शाबीर नावाचा व्यक्ती या परिसरात संशयितरित्या फिरताना आढळला. त्याला सुरक्षा रक्षकांनी मारले असे राज्य गृहमंत्री साजिद अहमद किचलू यांनी सांगितले.
जम्मूमध्ये बीएसएफ शिबीरावर हल्ला
गस्तीवर असताना सीमा सुरक्षा दलाचे जवान मनमानी करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या भागातील एका मदरशातील मौलवींनी या घटनेला खतपाणी घातल्यामुळे स्थानिकांनी रामबान येथील बीएसएफच्या शिबीरावर हल्ला चढवला. दरम्यान, या घटनेची कसून चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री
सुशीलकुमार शिंदे यांनी दिले आहेत. गरज असल्यास या भागात सुरक्षा जवानांची अतिरिक्त कूमक तैनात करण्यात यावी असे आदेश गृहमंत्र्यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. ही घटना दुर्दैवी असून मृत जवानांच्या कुटूंबियांच्या दु: खात सहभागी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. स्थानिक लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी असे आवाहन शिंदे यांनी नागरिकांना केले आहे.
