गैरहजर मंत्र्यांना निलंबितच करावे लागेल- विधानसभा उपाध्यक्ष पुरके यांनी ठणकावले

मुंबई, दि.18 -विधानसभेत आज मुख्यमंत्री, महसूलमंत्री, संसदीय कार्यमंत्री, पुनर्वसनमंत्री हजर नव्हते, याबद्दल उद्योगमंत्री नारायण राणे यांनी थेट दिलगिरीच व्यक्त केली. तर मंत्री हजर राहत नाहीत म्हणून वैतागलेल्या उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांनी नियमात, कायद्यात काय आहे हे मला माहीत नाही, पण एखाद्या दिवशी सभागृहाचा वेळ वाया घालवणार्‍या एक-दोन मंत्र्यांना दिवसभरासाठी निलंबितच करावे लागेल, असे ठणकावले.

आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या कामकाजावेळी हा प्रकार घडला. आजच्या कार्यक्रमपत्रिकेत विदर्भातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या भरपाईसंबंधी लक्षवेधी सूचना होती. मात्र, त्यावरील सरकारचे उत्तर आले नव्हते. शिवाय ही सूचना आजच्या ऐवजी नंतर घ्यावी, असे संबंधित मंत्र्यांनी कळवले होते, असे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांनी तसे सुरुवातीलाच सांगितले. मात्र, भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने तीव्र हरकत घेतली. त्यांना सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला. काँग्रेसचे विदर्भातील माजी मंत्री सुभाष झनक यांनीही विदर्भातील शेतकर्‍यांना मदत देण्याच्या विषयावर लक्षवेधी चर्चेला येत नसल्याबद्दल निषेध केला.
त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक सदस्यांनी या मुद्यावर विधानसभा तहकूब करण्याची मागणी केली. ती मान्य करीत उपाध्यक्षांनी काम पंधरा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले.

त्यानंतर सभागृह सुरू झाले तेव्हा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा तो विषय उपस्थित केला. अतिवृष्टीत, पुरात विदर्भातील शेतकरी व जनता अडचणीत आहे. या विषयावरील लक्षवेधीचे उत्तरही दिले जात नाही. महसूल, मदत व पुनर्वसन, गृह आदी अनेक खात्यांचा संबंध असताना एकही मंत्री हजर
राहत नाही. याबद्दल सरकारने माफी मागावी. अशी मागणी खडसे यांनी केली. तेव्हा लगेचच मंत्री उपस्थित नाहीत याबद्दल उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सरकारच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. ही लक्षवेधी सोमवारी घ्यावी, अशी विनंतीही केली. पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी शेतकर्‍यांना मदत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्याची माहिती दिली. परंतु सदस्यांचे समाधान झाले नाही. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी सरकार गंभीर नसल्याची टीका केली. त्यावर महत्त्वाच्या कामकाजप्रसंगी अनुपस्थित राहू नये. मंत्र्यांनाही निलंबन करण्याची पाळी आणू नये, असे उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी संबंधित मंत्र्यांना बजावले.

पांडुरंग मुख्यमंत्र्यांनाच पावणार काय?
उद्या आषाढी एकादशी आहे. तेथे शासकीय महापूजा पहाटे केली जाणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आज सकाळपासूनच तिकडे गेले आहेत. त्यामुळे ते सभागृहातील कामकाजात सहभागी झाले नव्हते. त्याबद्दल विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी निषेध केला. मुंबई व ठाणे परिसरात तसेच पुणे आदी ठिकाणी अधिकृत-अनधिकृत इमारती कोसळून होणार्‍या अपघाताची समग्र चर्चा विरोधी पक्षांनी उपस्थित केली होती. नगरविकास व मुंबई शहराशी संबंधित या चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः उत्तर देणे अपेक्षित आहे. मात्र, ते पंढरपूरसाठी निघून गेले आहेत. त्यामुळे ही चर्चा सुरूच होऊ शकत नाही. असे विरोधी पक्षनेते खडसे यांनी सांगितले.

सभागृहातील ही महत्त्वाची चर्चा ऐकून त्यांनी जायला हवे होते. पांडुरंग काय त्यांनाच पावणार आहे का? आम्हीही पंढरीला जाणार आहोत. रात्री सभागृहातील कामकाजानंतर मी जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनीही रात्री विमानाने जायला काय हरकत होती? असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्री ऐकायला नाहीत म्हणून मी सुभाष देसाई आदी सोमवारीच त्यावर बोलणार आहोत, असेही खडसे म्हणाले. त्यानंतर ही चर्चा आज सुरू झाली. मात्र ती सोमवारीच पुढे सरकेल.

Leave a Comment