सिंधुदुर्गात पोलिओ सदृश्य रुग्ण आढळला

सिंधुदुर्ग – कणकवली तालुक्यातील हळवल या गावात पोलिओ सदृश्य रुग्ण आढळल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णाचे सचिन आनंद कुर्‍हाडे(वय 4) असे नाव आहे. मागील 4 दिवसांपासून सचिनला ताप येत होता. अनेक वेळा रुग्णालयात नेऊनही त्याचा ताप बरा झाला नाही. दरम्यान काही दिवसानंतर त्याचा उजवा पाय व हात लुळा पडल्याने त्याच्या आई वडिलांनी तात्काळ येथील
प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. प्राथमिक आरोग्य केंद्रात तपास केल्यानंतर डॉक्टरांनी सचिनला ओरस येथील जिल्हा रुग्णालयात हलवले. जिल्हा रुग्णालयात तपासणी नंतर सचिन पोलिओ सदृश्य रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. सचिनचे रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले
असून त्याच्यावर तात्पुरता उपचार सुरु करण्यात आला असल्याची माहिती बालरोग तज्ज्ञ डॉ. व्हि. एस. ढवळे यांनी दिली. शासनाकडून पोलिओमुक्त भारत’ यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जातात. परंतु पोलिओ सदृश्य रुग्ण आढळल्याने सिंधूदुर्ग परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.