भोजन विषबाधेतील मृतांचा आकडा 22 वर पोहोचला

छपरा – बिहारमधील छपरामध्ये धरमसती गावात मध्यान्ह भोजन घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा होऊन त्यामध्ये आतापर्यंत 22 मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 10 मुलांची प्रकृती गंभीर आहे. तर 50 जणांवर उपचार सुरू आहेत. शाळेतील मध्यान्ह भोजन घेतल्यानंतर 50 मुलांची प्रकृती अत्यावस्थ झाली, ही सर्व मुले आठ ते बारा वयोगटातील आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची मदत जाहीर केली आणि या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान या घटनेनंतर छपरामध्ये संतप्त जमावाने निदर्शने केली. हॉस्पिटल आणि मध्यान्ह कार्यालयात नागरिकांनी तोडफोड केली. बिहार सरकारने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय जनता दल आणि भाजपने आज या घटनेच्या निषेधार्थ छपरा जिल्हा बंद पुकारला आहे.

मृतांमध्ये पहिली ते चौथी या इयत्तेत शिकणारी 10 वर्षे वयाखालील 16 मुले आहेत. या मुलांचा मृत्यू छपरामध्येच झाला तर इतर चौघांचा मृत्यू काल रात्रीच पाटण्यातील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणल्यावर झाला. पाटण्यातील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना आज सकाळी आणखी दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मिड डे मीलची खिचडी शिजवणार्‍या स्वयंपाकी महिला पन्नो देवीच्या दोन मुलांचाही समावेश आहे. मिड डे मील शिजवणारी आणखी एक महिला स्वयंपाकी मंजू देवी हिच्या तीन मुलांनीही येथीलच खिचडी खाल्ली होती, तिच्या तीनही मुलांवर आणि मंजू देवीवर पाटण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

केंद्र सरकारनेही या प्रकरणात लक्ष घातले असून, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री पल्लम राजू यांनी फोरेन्सिक अहवाल आल्यानंतर या प्रकरणी भाष्य करणार असल्याचे सांगितले आहे. बुधवारी दुपारपर्यंत या मृत्युकांडाला जबाबदार असलेल्या खिचडीचा फोरेन्सिक अहवाल येणार आहे. दरम्यान, छपरामध्ये आज मिड डे मील मृत्युकांडात बळी गेलेल्या 12 विद्यार्थ्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणामुळे संपूर्ण धरमसती गावासह छपरा परिसरावर शोककळा पसरली आहे या मुलांच्या अंत्यसंस्कारानंतर येथील एका संतप्त जमावाने दगडफेक आणि जाळपोळही सुरू केल्याचे वृत्त आहे. या संतप्त आंदोलनात काही स्थानिक लोकांसह राजकीयपक्षांच्या कार्यकत्यांचाही समावेश असल्याचे बिहार पोलिसांकडून सांगण्यातआले. या संतप्त जमावाने काहीवेळ रास्ता रोकोही केला. म़िड डे मीलवरून आता बिहारची राजधानी पाटणा आणि देशाची राजधानी यांच्यामध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. नितीश कुमार यांच्या सत्तेतून फारकत घेतलेल्या भाजपने सर्वप्रथम सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप केला तर सत्ताधारी जनता दल संयुक्तच्या नेत्यांनीही त्याला प्रत्युत्तर देताना नवे आरोप केले. या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत नंतर नितीश कुमार यांचे बिहारमधील प्रमुख विरोधक राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव आणि काँग्रेस नेत्यांनीही उडी घेतली. भाजपच्या राजीव प्रताप रूडी यांनी सर्व बाधित विद्यार्थ्यांना पाटण्यात उपचारासाठी हलवण्यात पंधरा तास लागले यावरून निष्काळजीपणाची पहिली तोफ डागली. अनेक विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना सत्ताधारी जदयू ने या सर्व प्रकरणामागे राजकीय षडयंत्र असल्याचाही आरोप केला. नितीश कुमार यांच्या सरकारला बदनाम करण्यासाठीचं हे कारस्थान असल्याचा आरोपही संयुक्त जनता दलाचे नेते केसी त्यागी यांनी केला.

लालू प्रसाद यादव यांनी भाजप आणि जेडीयू दोघांवरही टीका करताना, दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्यात व्यस्त असल्याचं सांगितलं, हे दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्यात गुंग असल्याने त्यांना बिहारमधील सर्वसामान्य जनतेकडे लक्ष देण्यासाठीच वेळ उरलेला नसल्यामुळेच हे मृत्युकांड झाल्याचाआरोपही लालूंनी केला. बिहारमध्ये सध्या जबाबदार सरकारचा अभाव असल्याचे या प्रकरणातून स्पष्टपणे पुढे आल्याचंही लालूंनी सांगितले. दरम्यान, बिहारचे शिक्षण मंत्री पी के साही यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की मिड डे मीलमध्ये पुरवण्यात आलेली खिचडी विषारी नाही, फक्त या दुर्घटनाग्रस्त शाळेतील खिचडीच विषारी होती, ही खिचडी विषारी होणे हा अपघात आहे की घातपात, हे लवकरच चौकशीतून स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.