आता कॉंग्रेसचा मोदी यांच्यावर पलटवार

नवी दिल्लील- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुण्यात कॉंग्रेसविरुद्ध हल्ला चढविला. त्यामुळे कॉंग्रेसने मोदी यांच्यावर पलटवार केला आहे. त्यामुळे आता निवडणूकीपूर्वीच भाजप आणि कॉंग्रेसमध्ये शितयुध्द रंगले आहे. या सर्व प्रकरामुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांची मात्र चांगलीच करमणूक होत आहे.

मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या पुण्यातील सभेत दिल्लीतील कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाला थेट लढण्याचे आव्हान दिले. तसेच त्यांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावरुन काँग्रेसला लक्ष्य केल्यानंतर काँग्रेसनेही आक्रमक पवित्रा घेत भाजपवर पलटवार केला आहे. नरेंद्र मोदी यांच्या नग्न सांप्रदायिकतेपेक्षा धर्मनिरपेक्षतेचा बुरखा केव्हाही चांगला असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. सांप्रदायिकतेमुळे विभाजन होते तर धर्मनिरपेक्षता माणसांना जोडते असे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस अजय माकन यांनी पत्रकारांना सांगितले.

काँग्रेसने यासाठी खास पत्रकारपरिषद घेऊन नरेंद्र मोदी आणि भाजपचा समाचार घेतला. नरेंद्र मोदी गुजरातच्या विकासाचा दावा करतात पण त्यांच्या कार्यकाळातच गुजरात विकासाच्या अनेक आघाडयांवर पिछाडीवर पडला आहे, असा दावा माकन यांनी केला. भाजपच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख जर चुकीची माहिती देत असतील, चूकीची आकडेवारी सांगत असतील तर आम्हाला त्याला उत्तर दिले पाहिजे, असे माकन म्हणाले.