हिंदु राष्ट्राला विरोध कशासाठी?

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आता उतरलेच आहेत. त्यांच्या पंजाब आणि महाराष्ट्रात काही सभा झाल्या आहेत आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काही बयानबाजीसुध्दा केलेली आहे. मोदी जपून बोलणार, मोजकेच बोलणार आणि शक्यतो वादग्रस्त बोलणार नाहीत असे समजले जात होते. कारण कोणत्याही एका बाजूने किंवा विचारावर अभिनिवेशाने बोलणे भारतासारख्या खंडप्राय आणि गुंतागुंतीची सामाजिक रचना असणार्‍या देशात खपत नाही. मोदी यांनी आजपर्यंत गुजरातच्या मर्यादेपर्यंत विकास, हिंदुत्व आणि गुजरातीपणाची भावना यांचा अहमहमिकेने प्रचार करून गुजरातवर कब्जा मिळविला आहे. पण गुजराती प्राईडची ही भावना देशातल्या सगळ्याच लोकांना अपील होईल असे नाही. त्यामुळे आता मोदींना काहीतरी वेगळे बोलावे लागणार हे निश्‍चित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाने मोदींना त्यांच्या हिंदुत्वासाठीच मैदानात उतरवले आहे. ही गोष्ट निर्विवाद आहे. परंतु आजपर्यंत तरी मोदींनी आजपर्यंत तरी हिंदुत्ववादी चेहरा प्रकट केला नव्हता. तो काल रॉयटर्सच्या मुलाखतीत प्रकट झाला.

तो अनावधानाने प्रकट झाला की जाणीवपूर्वक प्रकट केला हे आपण सांगू शकत नाही. परंतु त्यांनी या मुलाखतीत आपण हिंदु राष्ट्रवादी आहोत असे उघडपणे सांगितले आणि त्यांचे हे विधान वादग्रस्त ठरले आहे. मोदी हे वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. विशेषत: २००२ सालच्या गुजरात दंगलीनंतर त्यांच्याभोवती अनेक वाद जमा झाले आहेत. आता ते भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रचार प्रमुख आहेत. त्यांच्याकडे भाजपाचे कार्यकर्ते पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पहात आहेत. अजून तशी घोषणा झालेली नाही, परंतु भारतीय जनता पार्टीच्या डावपेचाचा एक भाग म्हणून तसे झालेले नाही. पण प्रत्यक्षात त्यांच्याकडे सारा देश पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पहायला लागला आहे. अशा वेळी त्यांनी जपून बोलणे आवश्यक आहे. कारण त्यांच्या प्रत्येक विधानाला मोठे महत्व आलेले आहे. आज मोदी जे काही बोलतील त्याचे परिणाम केवळ माध्यमातच होतील असे नाही तर २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या वातावरणावर सुद्धा ते होतील. त्यामुळे त्याचा विचार करून त्यांनी बोलायला पाहिजे. भाजपाचे कार्यकर्ते आणि नेते मोदी हे अटलबिहारी वाजपेयी यांना पर्याय ठरतील असे म्हणत आहेत पण या बाबतीत तरी वाजपेयी मोदीपेक्षा सावध होते हे लक्षात घेतले पाहिजे.

मोदी यांनी केवळ हिंदू असण्याला आणि हिंदू असल्याचा अभिमान बाळगण्याला कोणाचीच हरकत असणार नाही आणि असता कामा नये. शेवटी व्यक्ती म्हटल्यानंतर ती कोणत्या तरी धर्मात जन्माला येतच असते आणि त्या धर्माचा तिला अभिमान वाटणे यात गैर काही नाही. परंतु भारतासारख्या देशामध्ये जगातल्या सर्व धर्माचे लोक राहतात. भारतात हिंदू बहुसंख्य आहेत ही गोष्ट खरी, परंतु मुस्लीम, ख्रिश्‍चन, शीख, जैन, बौद्ध, ज्यू, पारशी याही धर्माचे लोक या देशात राहतात. त्यामुळे या देशाचा राष्ट्रवाद हा हिंदू राष्ट्रवाद असत नाही. तो भारतीय राष्ट्रवाद असतो. त्यामुळे एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याने आपण हिंदू राष्ट्रवादी आहोत असे म्हणणे हे भारतीय राज्य घटनेने स्वीकारलेल्या धर्मातीत धोरणाशी विसंगत आहे. आपण आधी राष्ट्रवादी आहोत आणि धर्माने हिंदू आहोत असा ङ्गरक त्यांनी आपल्या बोलण्यात केला असता तर त्याला कोणाचीही हरकत असण्याचे कारण नव्हते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारताला हिंदू राष्ट्र बनविण्याचे धोरण समोर ठेवलेले आहे. ही संघटना हिंदूंची आहे आणि हिंदूंचे संघटन करणे हे तिचे ध्येय आहे. या गोष्टीला कोणीच हरकत घेत नाही. परंतु या संघटनेच्या राष्ट्रविषयक कल्पनांना मात्र अनेकांची हरकत असते. कारण तिच्या हिंदू राष्ट्र या शब्दामध्ये इतर धर्मियांच्या मनात आशंका जमा होत असतात.

भारतात ८५ टक्के लोक हिंदू आहेत, त्यामुळे हे राष्ट्र हिंदू राष्ट्र होऊ शकते तसे त्याला म्हणण्यास हरकत का असावी? अशी हरकत घेणे हा हिंदूंचा अपमान आहे असे संघाचे म्हणणे असते. परंतु ही कल्पना थोडीशी तपासून घेतली पाहिजे. हे राष्ट्र हिंदू राष्ट्रच काय पण अन्य कोणत्याही धर्माचे राष्ट्र होता कामा नये. कारण ही कल्पना धर्मावर आधारलेली आहे आणि आधुनिक जगामध्ये धर्म हा राष्ट्राच्या उभारणीचा आधार होऊ शकत नाही. मानवी जीवनात धर्माचे एक महत्व आहे, पण ते मर्यादित स्वरूपाचे आहे. ते आध्यात्मिक आहे, पापा-पुण्याच्या कल्पनांशी निगडित आहे आणि मुख्यत्वे ते मृत्यूनंतरच्या गतीशी संबंधित आहे. प्रत्येक धर्म म्हणजे परमेश्‍वराच्या प्राप्तीचा एक वेगळा मार्ग आहे. आधुनिक जगामध्ये मानवी जीवनाची परिपूर्णता एवढ्याच गोष्टींनी होत नाही. आज आपले जीवन विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, व्यापार यांच्यावर आधारलेले आहे आणि हे धर्माचे विषय नाहीत. हे विषय धर्मावर सोपवले तर माणसाची प्रगती होणार नाही. तेव्हा धर्म हा माणसाच्या जीवनाचा सर्वांगीण आधार होऊ शकत नाही. देशाची उभारणी धर्मावर होत नाही, होता कामा नये. पाकिस्तानमध्ये तसा प्रयत्न चालू आहे, परंतु त्यामुळे तो देश किती मागे पडला आहे हे आपण पहातच आहोत. त्यामुळे हिंदू राष्ट्राची कल्पना घटनेशी विसंगत आहे. मोदी यांनी आपण हिंदू राष्ट्रवादी आहोत असे म्हणणे हे घटनेशी सुसंगत नाही.