४ नंतर दुकाने उघडी ठेवण्यासाठी होते ५ हजारांपासून एक हजारापर्यंतची वसुली; ‘मनसे’ने शेअर केला व्हिडीओ


मुंबई – मनसे नेते संदीप देशपांडे यांनी कोरोनासंदर्भात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी करण्याऐवजी मुंबई पोलिसांकडून दुकाने सुरु ठेऊ देण्यासाठी भ्रष्टाचार आणि हफ्ता वसुली केली जात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. दादरमधील एक व्हिडीओ शेअर करत देशपांडे यांनी पोलीस कोणत्या दुकानांकडून वसुलीसाठी किती रक्कम घेतात याचे ‘रेट कार्ड’च सांगितले आहे.

दुपारी चार वाजल्यानंतरही दादर पश्चिमेला रेल्वे स्टेशनबाहेरील भाजी मंडईजवळ असणाऱ्या नक्षत्र मॉलच्या गल्लीमधील दुकाने ही खुली असल्याचे दाखवणारा व्हिडीओ देशपांडे यांनी पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये दुपारी चार वाजल्यानंतरही अनेक छोटी, मोठी दुकाने सुरु असल्याचे व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती सांगत आहे. दुपारी चारनंतर या गल्लीतून बाईकवरुन फेरफटका मारत येथील परिस्थिती व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केली. अनेक दुकाने ही अर्धी शटर उघडी ठेऊन सुरु असल्याचे तसेच काही दुकांनांबाहेर दुकानातील कर्मचारी उभे राहून सरकारी अधिकाऱ्यांच्या हालचालींवर नजर ठेवत असल्याचे दिसत आहे.

संदीप देशपांडेंनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करताना व्हिडीओला, आधी वसुली बार मालकांकडून… आता वसुली व्यापाऱ्यांकडून, अशी कॅप्शन दिली आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी, मुंबईमध्ये कोरोनाच्या नावावर नवीन वसुली मोहीम सुरु, असल्याचे म्हटले आहे. संध्याकाळी चारनंतर दुकान सुरु ठेवण्यासाठी मोठ्या दुकानांकडून पाच हजार रुपये, मध्यम आकाराच्या दुकांनांकडून दोन हजार तर छोट्या दुकानांकडून एक हजार रुपये वसूल केले जातात असा आरोप देशपांडेंनी केला आहे. या वसुलीच्या दरांना त्यांनी ‘रेट कार्ड’ असे म्हटले आहे.

सायंकाळी ४ वाजेपर्यंतच निर्बंधकाळात बाजारपेठा खुल्या राहतील, असे आदेश राज्य सरकारने दिले असले तरी प्रत्यक्षात मात्र रात्री उशिरापर्यंत बाजारपेठांमध्ये गर्दी दिसत आहे. गल्लोगल्ली बसलेले फेरीवाले आणि त्यांच्याकडे जमावाने होणारी खरेदी यामध्ये मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचेही पालन होताना दिसत नाही. काही ठिकाणी पोलिसांकडून कारवाई होऊन देखील फेरीवाल्यांना निर्बंधांची पर्वा राहिलेली नाही. पोटापाण्याचा प्रश्न गंभीर असल्यामुळे कारवाईलाही सामोरे जाऊ, असा सूर फेरीवाल्यांचा आहे.


कोरोनाच्या उत्परिवर्तीत विषाणूचा धोका लक्षात घेता राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले. बाजारपेठा, दुकाने खुली ठेवण्यासाठी यामध्ये सायंकाळी ४ पर्यंतची मर्यादा घालण्यात आली. पण बाजारपेठांमध्ये या निर्बंधांना हरताळ फासला जात आहे. सायंकाळी ४ नंतर घरी परतणारा कर्मचारीवर्ग खरेदीसाठी येत असल्यामुळे दुकानदार तासभराच्या दिरंगाईने दुकाने बंद करतात. साधारण सायंकाळी ६ च्या सुमारास सर्व दुकाने बंद होतात.

पण त्याच वेळी रस्त्यावर बसलेल्या फेरीवाल्यांना उधाण येते. दुकाने बंद झाल्यामुळे जास्तीचा ग्राहकवर्ग मिळतो, घरी जाणारे लोक आवर्जून खरेदी करतात. त्यामुळे या प्रकाराला अधिकच खतपाणी मिळते आहे. मुंबईतील बहुतांशी भागात हीच परिस्थिती आहे. दादर स्थानकाबाहेरची अवस्था अत्यंत बिकट आहे. कबूतरखाना, आसपासच्या गल्ल्या आणि स्थानक परिसरात शेकडो फेरीवाले रात्री उशिरापर्यंत दुकाने मांडून बसलेले असतात. अनेकांना मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडलेला असतो. फेरीवाल्यांचे पेव धारावी, माटुंगा लेबर कॅम्प, परळ, चेंबूर, घाटकोपर, अंधेरी आणि अन्य मध्यमवर्गीय वस्त्यांनजिक पाहायला मिळते.

पोलिसांच्या आणि पालिकेच्या गाड्या फुले, फळे, भाज्या, चपला, कपडे, भांडी इत्यादी वस्तू घेऊन बसलेल्या या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी येताच फेरीवाले आवाराआवर करून पळ काढतात. बऱ्याचदा कारवाई केल्यानंतरही पुन्हा फेरीवाले दुकान थाटतात, असे पोलिसांचे म्हणणे आहे. कारवाईदरम्यान कठोर भूमिका घेता येत नाही. तसे केले तरी त्याचे चुकीचे प्रदर्शन माध्यमातून केले जाते. शिवाय प्रत्येकाचीच परिस्थिती हलाखीची असल्याने दंड आकारतानाही फेरीवाले गायावया करतात, हात जोडतात. त्यामुळे परिस्थिती संयमाने हाताळावी लागते, असे दादर येथील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.