नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या संबंधात ऐतिहासिक निर्णय दिल्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे खासदार कोण असा साहजिकच प्रश्न सर्वांना पडला आहे. लोकांची ही जिज्ञासा विचारात घेऊन एका स्वयंसेवी संघटनेने लोकसभेचे रेकॉर्ड तपासून सर्वाधिक गुन्हे दाखल असलेल्या टॉप फाईव्ह खासदारांची माहिती मिळविली आहे. या सर्वोच्च पाच खासदारांत दोन खासदार महाराष्ट्रातले आहेत.
गुन्हेगारी पार्श्वभूमी; टॉप फाईव्ह खासदार
सर्वाधिक गुन्हे दाखल असणारे झारखंड मुक्ती मोर्चाचे खासदार कामेश्वर बैथा हे ५६ वर्षांचे असून त्यांच्या विरुध्द ४६ खटले प्रलंबित आहेत. ते झारखंड राज्यातील पालामाऊ मतदारसंघातून २००९ साली लोकसभेवर निवडून आले आहेत. त्यांच्यावर दाखल झालेल्या ४६ खटल्यांमध्ये २२ खटले खुनाच्या प्रयत्नाचे असून १७ खटले खुनाचे आहेत. त्या व्यतिरिक्त लहान मोठे दरोड्याचे, अपहरणाचे, विनापरवानगी घुसखोरी केल्याचे असे प्रलंबित नसणारे अनेक खटले त्यांच्याविरुध्द आहेत.
महाराष्ट्राच्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून येणारे भाजपाचे खासदार हंसराज गंगाराम अहिर यांच्यावर ३० खटले प्रलंबित आहेत. त्यांना यातल्या कोणत्याही खटल्यात शिक्षा झालेली नाही. विशेष म्हणजे त्यांच्यावर खुनाचा खटला नाही. मात्र सार्वजनिक शांतता भंग करणे, लोकसेवकाच्या कामात अडथळा आणणे, जमाव जमवणे, घर लुटणे, दंगल असे खटले आहेत. त्यांच्यावरचा एक खटला तर विघातक कृत्य करून सरकारचे ५० रुपयांचे नुकसान केल्याबद्दलचा आहे.
वल्लभभाई राडादिया हे गुजरातेतील कॉंग्रेसचे खासदार तिसर्या क्रमांकावर असून ते पोरबंदर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आलेले आहेत. त्यांच्यावर २० खटले आहेत. त्यातले दोन खटले दरोडा टाकण्याचे आहेत. सदोष मनुष्यवधाचा खटला आहे. शिवाय शांतता भंग करणे, बेकायदा जमाव जमवणे असे छोटे मोठे आरोप त्यांच्यावर आहेत. केरळच्या पलक्कड मतदार संघातून निवडून आलेले माकपाचे खासदार एम.बी.राजेश यांच्यावर १६ खटले आहेत तर महाराष्ट्राच्या सातारा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावरून निवडून आलेले श्रीमंत प्रतापसिंग भोसले उर्फ उदयनराजे भोसले हे पाचव्या क्रमांकावर असून त्यांच्यावरचे १४ खटले प्रलंबित आहेत. त्यातला एक खटला खुनाच्या प्रयत्नाचा आणि एक खटला अपहरणाचा आहे.
