राहुल गांधींची उमेदवारी जाहीर होणार नाही

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे खासदार आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांची पंतप्रधान पदाची उमेदवारी जाहीर केली जाणार नाही असे पक्षाचे सरचिटणीस दिग्वीजयसिंग यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या देशामध्ये अध्यक्षीय राज्यपध्दती नाही त्यामुळे कोणाचेही नाव अशा पध्दतीने निवडणुकीच्या आधीच पंतप्रधान म्हणून जाहीर करणे योग्य नाही असे कॉंग्रेस पक्षाला वाटते म्हणूनच पक्षाने यापूर्वी कधी निवडणुकीच्या आधी पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. एवढेच नव्हे तर कॉंग्रेस पक्षाच्या मुख्यमंत्र्यांचेसुध्दा नाव आधी जाहीर केले जात नाही. नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीतसुध्दा कॉंग्रेस पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आधी जाहीर झाला नव्हता असे श्री. सिंग म्हणाले.

भारतीय जनता पार्टीने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पक्षाचा प्रचारप्रमुख केलेले आहे. त्याचे कॉंग्रेसवर काय परिणाम होतील असा प्रश्‍न विचारला असता श्री. दिग्विजयसिंग यांनी कॉंग्रेसवर काही परिणाम होणार नाही असा निर्वाळा दिला. परंतु मोदी यांच्या नावाच्या घोषणेमुळे देशात जातीय धु्रवीकरण होईल असे प्रतिपादन केले. अशा स्थितीत कॉंगे्रस पक्ष डाव्या आघाडीशी हात मिळवणी करू शकतो असेही त्यांनी सूचित केले.

श्री. नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात पत्रकारांनी दिग्विजयसिंग यांना अनेक प्रश्‍न विचारले. परंतु त्यांनी त्यांची थेट उत्तरे दिली नाहीत. कॉंग्रेसचा सामना कोणत्याही एका व्यक्तीशी नाही. नरेंद्र मोदी असोत की लालकृष्ण अडवाणी असोत. कॉंग्रेसचा सामना संघाच्या विचारांशी आहे असे ते म्हणाले.

Leave a Comment