
नागपूर – एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नागपुरात समोर आली आहे. कुटुंबप्रमुखाने या हत्या केल्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. ही मन सुन्न करणारी घटना नागपुरच्या पाचपावली भागात घडली आहे. दरम्यान घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मन सुन्न करणारी घटना; नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आलोक माथुरकर याने आपली पत्नी, मुलगा, मुलगी यांची हत्या केली. नंतर तिथेच थोड्या अंतरावर राहणाऱ्या सासरी जाऊन सासू आणि मेहुणीची हत्या केली. हत्या केल्यानंतर तो पुन्हा आपल्या घऱी आला आणि गळफास घेत आत्महत्या करुन जीवन संपवले.
हा सगळा प्रकार रविवारी रात्री घडल्याचे समजत आहे. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला असून सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहेत. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या हत्या कौटुंबिक कलहातून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, पण अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
