कोरोना होऊन गेल्यानंतर पुन्हा लक्षणे दिसल्यास असू शकतो स्वाईन फ्लू; तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती


मुंबई – सध्या देशात सुरू असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत इन्फ्लूएंझा एच१ एन१ किंवा स्वाईन फ्लूचा धोका जाणवू लागला आहे. स्वाईन फ्लू आणि कोरोना बाधितांमधील लक्षणे सारखीच असल्यामुळे इन्फ्लूएंझा एच१ एन१च्या लक्षणांचा देखील विचार करण्यात यावा, असा सल्ला संसर्गजन्य रोग तज्ज्ञांनी दिला आहे. कारण कोरोना उपचारांना रुग्ण प्रतिसाद देत नसल्यास स्वाईन फ्लूची तपासणी करावी, असे तज्ञांनी म्हटले आहे. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ वसंत नागवेकर यांनी सर्दी, ताप आणि डोकेदुखीच्या कारणासाठी आलेल्या दोन रुग्णांना एच१ एन१ची लागण झाल्याचे सांगितले. नुकताच ३० वर्षीय एक रुग्ण कोरोनातून बरा झालेला, असताना पुन्हा लक्षणे जाणवू लागल्याने डॉ वसंत नागवेकर यांची त्याने भेट घेतली होती. पुन्हा लागण होण्याचा प्रकार दुर्मिळ असल्यामुळे त्या रुग्णाचे नमुने त्यांनी चाचणीसाठी पाठवले. दरम्यान, रुग्णाला एच१ एन१ची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर डॉ. नागवेकर यांनी आणखी रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता आणखी एक रुग्ण एच१ एन१ संक्रमित तर तिसरा रुग्ण एच३ एन२ संक्रमित असल्याचे आढळले.

महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार यावर्षात एच१एन१ ची दोन प्रकरणे समोर आल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले. कोरोनाची सुरुवात गेल्या वर्षी झाली होती, त्यावेळी ४४ रुग्णांची नोंद झाली होती. तर २०१९ मध्ये ४५१ रुग्णांची नोंद झाली होती आणि ५ जणांचा मृत्यू झाला होता.

कोरोना आणि एच१ एन१ हे दोन्ही श्वसनामार्गाला होणारे संसर्ग रोग आहेत, म्हणूनच योग्य निदान करणे महत्वाचे असल्याचे संसर्गजन्य रोग तज्ज्ञ आणि टास्कफोर्सचे सदस्य डॉ. ओम श्रीवास्तव यांनी सांगितले. दोन विषाणूंमध्ये, त्यांचा जिवंत राहण्याचा कालावधी आणि ते कसे पसरतात यामध्ये समानता आहे, परंतु काही महत्त्वाचे फरक असल्याचे डॉ. श्रीवास्तव म्हणाले. एच १ एन १ च्या सकारात्मक अहवालाकडे दुर्लक्ष करू नये, कारण यामुळे गंभीर आजार किंवा मृत्यू देखील होऊ शकतो, असे डॉ. श्रीवास्तव यांनी सांगितले.