विरोधकांना एकत्र आणण्याची शरद पवार यांची रणनिती; उद्या घेणार भाजपविरोधी पक्षांची बैठक


नवी दिल्ली – देशभरातील भाजप विरोधी पक्षांची मोट बांधण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरुवात केली आहे. शरद पवार २०२४ निवडणुकीपूर्वी विरोधकांना एकत्र आणण्याची रणनिती आखत असल्याचे सांगितले जात आहे. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंगळवारी दुपारी ४ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. विरोधक कोरोना काळात पहिल्यांदाच व्हिडिओ कॉन्फरन्सऐवजी एकत्र बैठकीला उपस्थित राहणार आहेत. १५ पक्षांचे प्रमुख राष्ट्रमंचच्या माध्यमातून या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीचे आमंत्रण राष्ट्रीय जनता दल नेते तेजस्वी यादव यांनाही देण्यात आले आहे. पण काँग्रेसला या बैठकीचे आमंत्रण देण्यात आलेले नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पहिल्यांदाच राष्ट्र मंचाच्या बैठकीत भाग घेणार आहेत. यशवंत सिन्हा यांनी राष्ट्र मंचची पायाभरणी २०१८ साली केली होती. राष्ट्र मंचाकडून सध्या तरी कोणत्याच राजकीय वाटलीची घोषणा करण्यात आलेली नाही. पण राजकीय जाणकारांनी भविष्यात तिसरी आघाडी स्थापन करण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांना तिसऱ्या आघाडीचा चेहरा बनवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे. तसेच शरद पवार तिसऱ्या आघाडीच्या संयोजकपदाची भूमिका पार पाडतील, असेही सांगण्यात येत आहे.

एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या दोघांमध्ये पहिल्या बैठकीत जवळपास ४ तास चर्चा झाली होती. त्यानंतर ११ जूनला पुन्हा एकदा बैठक झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०२४ च्या निवडणुकीत रोखण्यासाठी रणनिती आखली जात असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही काँग्रेस महासचिव, राज्य प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. ही बैठक २४ जूनला आहे.न