सुवर्णपदकाची हॅट्ट्रिक; पोलंड ओपनमध्ये ५३ किलो वजनी गटात कुस्तीपटू विनेश फोगटने पटकावले सुवर्णपदक


पोलंड – शानदार प्रदर्शन करत भारताच्या झोळीत स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगटने आणखी एक सुवर्णपदक ठेवले आहे. शुक्रवारी पोलंड ओपनमध्ये ५३ किलो वजनी गटात झालेल्या सामन्यात विनेशने विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले. या सुवर्णपदकामुळे तिची टोकियो ऑलिम्पिकची तयारी योग्य दिशेने चालली आहे, हे दिसून येते.

विनेशला यंदा होणाऱ्या ऑलिम्पिकपूर्वी जास्त सराव करता आलेला नाही. २६ वर्षीय विनेशचे हे हंगामातील तिसरे विजेतेपद आहे. यापूर्वी मार्चमध्ये मॅटिओ पेलिकोन आणि एप्रिलमध्ये आशियाई स्पर्धेतही तिने सुवर्णपदक जिंकले. विनेश या विजयामुळे टोकियो ऑलिम्पिकमधील अव्वल मानांकित कुस्तीपटू होण्याची शक्यता आहे.

२०१९च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी ईकाटेरिना पोलीशच्यूक वगळता विनेशला तिच्या कोणत्याही प्रतिस्पर्ध्याकडून जास्त त्रास झाला नाही. अंतिम सामन्यात तिने युक्रेनच्या बेरेझा विरूद्ध एकही गुण गमावला नाही आणि ८-० असा विजय नोंदविला.

२०१९च्या युरोपियन स्पर्धेतील रौप्यपदक विजेती बेरेजा सामन्यात बचावात्मक पद्धतीने खेळत होती. भारताच्या अंशु मलिकला तापामुळे ५७ किलो वजनी गटात स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. विनेशने सलामीच्या लढतीत अमेरिकेच्या अ‍ॅमी अ‍ॅन फीअर्नसाइडला ७५ सेकंदांत नामोहरम केले. मग २०१९च्या जागतिक कांस्यपदक विजेत्या ईकाटेरिना पोलीशच्यूकला नमवले.