कोपर्डी प्रकरणाचा निकाल सहा महिन्यांत लागलाच पाहिजे; संभाजीराजेंची मागणी


कोपर्डी – आज (शनिवार) कोपर्डी येथे जाऊन सामुहिक बलात्काराच्या घटनेतील पीडितेच्या कुटुंबियांची छत्रपती संभाजीराजे यांनी भेट घेतली. लवकरात लवकर कोपर्डीमधील निर्भयाला न्याय मिळायला पाहिजे. हे सर्व प्रकरण सहा महिन्यात निकाली लागायला हवे, अशी मागणी संभीजाराजेंनी पत्रकार परिषदेत केली आहे.

संभाजीराजे यावेळी म्हणाले की, या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्याबाबत काय निर्णय झाला आहे. हे सरकारला कानावर घालण्यासाठी देखील मी येथे आलो आहे. या आरोपींना २०१७ मध्ये शिक्षा झाली आणि नंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. एक कायदा असा सांगतो की, दोषी जे असतात त्यांना उच्च न्यायालयात अपीलसाठी दोन वर्षे संधी मिळते. म्हणून त्यांनी २०१९ मध्ये पुन्हा एकदा उच्च न्यायालयात अपील केले होते. पण २०१९ ते २०२० एक वर्ष होऊन गेले व आजही ते प्रकरण प्रलंबितच आहे.

पीडितेच्या कुटुंबीयांना मी येथे भेटलो, त्यांच्याही मनात आक्रोश होता. त्यांची एवढीच इच्छा होती की समाजाला न्याय मिळावा आणि आमच्या भगिनीला न्याय मिळावा. म्हणून माझी सरकारला हीच विनंती राहणार आहे, तुम्ही तत्काळ उच्च न्यायालयाला अर्ज करावा व त्यामध्ये तुम्ही नमूद करणे गरजेचे आहे, यासाठी विशेष खंडपीठ स्थापन केले पाहिजे. विशेष खंडपीठाच्या माध्यमातून सहा महिन्यात या प्रकरणाचा निकाल लागला पाहिजे. येथून गेल्यानंतर मी ताबडतोब मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे.

तर, हा सामुहिक बलात्कार २०१६साली झाला. २०१७ ला ते दोषी असल्याचा निकाल लागला. आता २०२१ आहे. अजूनही पुढची कारवाई का झाली नाही? त्या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. पण अद्याप त्याची अंमलबजावणी केली जात नाही. हे लक्षात घेता, आता राज्य सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून, सहा महिन्यांत हा विषय निकाली काढावा. या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी आमची मागणी असल्याचे संभाजीराजेंनी कोपर्डी येथे जाण्या अगोदर बोलून दाखवले होते.