अहमदाबाद, दि.3 – इशरत जहाँ एन्काऊंटरप्रकरणी सीबीआय आज अहमदाबादच्या विशेष कोर्टात आरोपपत्र दाखल करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सीबीआयच्या आरोपपत्रात इशरतचा ’दहशतवादी’ म्हणून उल्लेख करण्यात आलेला नाही. तसंच नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय भाजपचे सरचिटणीस अमित शाह आणि
गुप्तचर यंत्रणेचे संचालक राजेंद्र कुमार यांचाही या आरोपपत्रात समावेश नाही.
मात्र गुजरातचे माजी डीजीपी डी जी बंजारा आणि माजी आयपीएस जी एल सिंघल यांची नावं आरोपपत्रात समाविष्ट करण्यात येतील, अशी माहिती मिळत आहे. तसंच राज्यातील काही पोलिस अधिकार्यांचीही नावं आरोपपत्रात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गुजरात पोलिसांनी अहमदाबादमध्ये 2002मध्ये इशरत जहाँसह आणखी तिघांचं एन्काऊंटर केलं होतं. इशरतसह इतर तीन जण दहशतवादी असून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे या तिघांच्या निशाण्यावर होते, असं दावा पोलिसांनी केला होता. मात्र हे एन्काऊंटर बनावट असल्याचा आरोप झाल्यानंतर प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात होतं. एन्काऊंटरमध्ये ठार झालेल्यांमध्ये मुंबईतील विद्यार्थीनी इशरत जहाँसह परनेश गोपीनाथ पिल्लई, अमजद अली आणि जीशान जोहर याचां समावेश होता.