आता ट्विटर ब्लूमध्ये Undo, Color Themes सह मिळणार अनेक वैशिष्ट्ये


नवी दिल्ली : मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर (Twitter) लाँच झाल्यापासून युजर्स एडिट बटण देण्याची मागणी करत होते. याच दरम्यान शब्दाची मर्यादा वाढविणे, डार्क मोडचा पर्याय यासारख्या अनेक मागण्या ट्विटर युजर्सकडून होत होत्या. पण अद्यापतरी एडीट बटणचा पर्याय उपलब्ध झालेला नाही. पण, आता undo पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हे फिचर ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन असणाऱ्यांना वापरता येणार आहे.

सोशल मीडिया कंपनीची ट्विटर ब्लू ही पहिली सबस्क्रिप्शन ऑफर आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कंपनी आपला महसूल स्रोत वाढवत आहे. सध्या कंपनीचा व्यवसायाचा मुख्य स्रोत हा जाहिरात विक्रीतून येत आहे. ही सेवा आता ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये उपलब्ध आहे. ही सेवा भारतात कधी उपलब्ध होईल, याबद्दल अद्याप काही सांगण्यात आले नाही. परंतु, सबस्क्रिप्शनची किंमत अॅपल स्टोअरवर भारतात दरमहा 269 रुपये दाखविण्यात येत आहे.

अशी आहेत ट्विटर ब्लूची वैशिष्ट्ये

  • ट्विटर ब्लू वापरकर्त्यांना सध्या तीन प्रीमियम वैशिष्ट्यांमध्ये अक्सेस मिळणार आहे. ज्यात Undo Tweet, Bookmark Folders, Reader Mode, कस्टमायजेबल, Twitter Icons आणि Colour theme या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
  • Undo Tweet च्या माध्यमातून नावाप्रमाणेच ट्वीट पूर्ववत करता येणार आहे, ट्विटर वापरकर्त्यांना आधीचे पोस्ट केलेले ट्विट पूर्ववत करण्याची परवानगी यामध्ये मिळणार आहे.
  • Bookmark Folders हे फिचर वापरुन वापरकर्त्यांना बुकमार्कची व्यवस्थित यादी तयार करता येणार आहे. यात पूर्वीसारखा गोंधळ होणार नाही.
  • Reader Mode मुळे वापरकर्त्यास ट्विट थ्रेड वाचने सोपे होणार आहे. थ्रेडला मजकूरात रूपांतरित करणे आणि वाचन करणे यामुळे सुलभ होईल. थ्रेडमधील सर्व ट्वीटस एकाच स्क्रीनमध्ये एकत्रित दिसणार आहे.
  • भिन्न Colour theme ट्विटर ब्लूच्या वापरकर्त्यांना वेगवेगळ्या रंगाच्या थीम त्यांच्या UI मध्ये समाविष्ट करण्यास आणि मुख्य ट्विटर चिन्हाचा रंग डीफॉल्ट निळ्यापासून गुलाबी, जांभळा, पिवळा किंवा नारिंगीमध्ये करता येणार आहे.

ट्विटर ब्लू ही सशुल्क, मासिक सदस्यता-आधारित योजना आहे. जी वापरकर्त्यांना अतिरिक्त वैशिष्ट्ये प्रदान करते. ट्विटरवर ‘ब्लू टिक’ मिळविण्याशी या सेवेचा काहीही संबंध नाही. ब्लू टिक सुप्रसिद्ध खात्यांना दिलेली ओळख आहे, हे लक्षात ठेवा.