यापुढे ६ जून रोजी महाविद्यालये, विद्यापीठांत साजरा केला जाणार शिवस्वराज्य दिन


मुंबई : यापुढे दरवर्षी राज्यातील सर्व विद्यापीठे व सलग्न महाविद्यालयांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून हा राज्यभिषेक दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित विविध प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करून हा दिवस साजरा करण्यात येणार आहे.

६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला. शिवराज्यभिषेक हा स्वराज्याची, स्वातंत्र्याची, सार्वभौमत्वाची प्रेरणा देणार दिवस म्हणून मानला जातो. यापुढे राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतने व तत्सम शैक्षणिक संस्थांमध्ये दर वर्षी ६ जून हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या संदर्भात गुरुवारी शासन आदेश काढून शिवस्वराज्य दिन कशा प्रकार साजरा करावा, याची माहिती दिली आहे. विद्यीपीठे, महाविद्यालयांमधील सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांनी सकाळी ११ वाजता शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस किंवा पुतळ्यास अभिवादन करावे. त्याचबरोबर शिवचरित्रपर व्याख्याने, पथनाट्ये, गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन, निबंध, वत्कृत्व, गीत गायन, पोवाडा गायन, क्रीडा व इतर स्पर्धांचे व उपक्रमांचे आयोजन करून हा दिवस साजरा करण्यास सांगण्यात आले आहे.