जगभरातल्या महिलांना पुरुषांच्या वर्चस्वाखाली जगावे तर लागतेच परंतु ज्या महिलांना छळाचा अतिरेक करून मारले जाते त्यातल्या ३८ टक्के महिलांना त्यांच्या नवर्यानेच मारलेले असते, असे जागतिक आरोग्य संघटनेेने केलेल्या पाहणीत निष्पन्न झाले आहे. या संबंधीच्या अहवालामध्ये जगभरातल्या हत्या झालेल्या महिलांची आकडेवारी देण्यात आली आहे आणि त्यातल्या एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या महिला आपल्या पतीच्या हिंसेला बळी पडले असल्याचे म्हटले आहे. भारतासह दक्षिण आशियामध्ये हे प्रमाण जास्त आहे. या भागाातील संशयास्पद मृत्यू झालेल्या महिलांच्या प्रकरणांपैकी ५९ टक्के प्रकरणात त्यांचे पतीच आरोपी असल्याचे दिसले आहे.
महिलांना नवर्याचाच खरा धोका
द. लान्सेट या मासिकामध्ये हा अहवाल प्रसिध्द झाला आहे. महिला जशा आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या हिंसेला बळी पडतात तसाच प्रकार पुरुषांच्या बाबतीतसुध्दा घडतो. त्यांच्याही हत्येला त्यांच्या बायका कारणीभूत असतात परंतु अशा पुरुषांचे प्रमाण केवळ ६ टक्के एवढे आहे. म्हणजे बायकांना नवर्यापासून जेवढा धोका आहे तेवढा पुरुषांना आपल्या बायकापासून नाही. या अहवालामध्ये निरनिराळ्या देशातील आकडेवारी दिलेली आहे. त्यात ब्रिटनमधली आकडेवारी भारताच्या जवळपास जाणारी आहे. तिथल्या ५४ टक्के महिला नवर्याच्या हिंसेला बळी पडलेले आहेत तर केवळ ५ टक्के नवरे आपल्या बायकोच्या हिंसेला बळी पडलेले आहेत.
अशा आपल्या जीवनाच्या साथिदाराकडून कधीही मारले जाण्याची शक्यता महिलांमध्ये जास्त आहे. ही गोष्ट खरी परंतु एकंदरीत खून किंवा हत्या होण्याचे प्रमाण महिलांपेक्षा पुरुषांत जास्त आहे. म्हणजे आर्थिक कारणावरून, गुन्हेगारीवरून, गुंडगिरीमधून, राजकारणातून होणार्या खुनांत महिलांचे प्रमाण अत्यल्प आहे. अशा वेगळ्या कारणावरून होणार्या खुनांत पुरुषांचे प्रमाण महिलांपेक्षा कितीतरी जास्त आहे.
